ठाकुर्ली उड्डाणपूलालगतचा 'यू टर्न' ठरतोय धोकादायक वाहनांचा खोळंबा; अपघाताला मिळतेय निमंत्रण
By प्रशांत माने | Published: April 14, 2023 06:08 PM2023-04-14T18:08:23+5:302023-04-14T18:08:40+5:30
वाहनांचा खोळंबा होऊन कोंडीचे चित्र या परिसरात सकाळ-संध्याकाळ पहायला मिळतेय.
डोंबिवलीः पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाणपूलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने उड्डाणपूल बांधला. परंतु पुलालगतच्या अरुंद रस्त्यांमुळे येथील वाहतूकीला एकिकडे अडथळे निर्माण होत असताना पूर्वेकडील उड्डाणपूलाला लागून असलेला ' यु टर्न ' अपघात क्षेत्र ठरत आहे. यात वाहनांचा खोळंबा होऊन कोंडीचे चित्र या परिसरात सकाळ-संध्याकाळ पहायला मिळतेय.
कोपर उड्डाण पूलाच्या कामाच्या वेळी ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाढलेली वाहतूक आणि या परिसरातील अरुंद रस्ते यातील काही मार्ग हे एकदिशा करण्यात आले होते तर काहीठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी पी १ आणि पी २ असे बदल सूचविले होते. महत्वाचे म्हणजे काही रस्त्यांवर वाहन पार्क करण्यास बंदी घालण्यात आली होती. कानविंदे चौक, व्ही पी रोड, मंजूनाथ चौक, गुरूमंदिर रोड, छेडा रोड, छत्रपती संभाजी महाराज पथ या भागांमध्ये हे बदल सूचविण्यात आले होते. परंतु कोपर उड्डाणपूल सुरु होताच इथल्या वाहतुकीचा कमी झालेला ताण पाहता आजच्या घडीला सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. यात सकाळ-संध्याकाळ कोंडीची समस्या अरुंद रस्ते आणि गल्ली बोळातून येणाऱ्या वाहनांनी उदभवत आहे.
महत्त्वाचे म्हणजे ठाकुर्ली स्थानकापासून उड्डाणपूलाकडे येणारी वाहतूक आणि उड्डाणपूलावरुन त्या दिशेकडे जाणाऱ्या वाहनांमुळे सद्यस्थितीला बिकट अवस्था निर्माण झाली आहे. चिंचोळ्या गल्लीतून उड्डाणपूलाकडे जाणारा हा ' यु टर्न ' अपघातांना देखील कारणीभूत ठरत आहे. यात एकमेकांसमोर येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊन पूल परिसरात कोंडीची समस्या उदभवत आहे. डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांकडून यावर उपाययोजना करणे आवश्यक होते पण कोंडी आणि अपघातांच्या काहीप्रसंगी घडणाऱ्या छोटया घटना पाहता त्यांना या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.