नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्या रिषिकाची दुर्दैवी कहाणी, जन्मापासून शारीरिक दोषांनी त्रस्त

By नितीन पंडित | Published: July 21, 2023 05:33 AM2023-07-21T05:33:13+5:302023-07-21T09:59:56+5:30

नाल्यात पडून गेली वाहून : वाडिया इस्पितळात दहाव्या दिवसापासून सुरू होते उपचार

The unfortunate story of Rishika, who suffers from physical defects since birth | नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्या रिषिकाची दुर्दैवी कहाणी, जन्मापासून शारीरिक दोषांनी त्रस्त

नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्या रिषिकाची दुर्दैवी कहाणी, जन्मापासून शारीरिक दोषांनी त्रस्त

googlenewsNext

नितीन पंडित

भिवंडी : ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिला जन्मापासून शौचाच्या ठिकाणी जागेचा विकार असल्याने तिच्यावर दहाव्या दिवसापासून मुंबईतील वाडिया इस्पितळात उपचार सुरू होते. बुधवारी त्याच उपचारासाठी या तान्हुलीला घेऊन तिचे आजोबा व आई गेले होते. परत येताना पावसाने रेल्वेसेवेला फटका बसल्याने त्यांनी रेल्वे मार्गावर उतरून प्रवास सुरू केला. पावसापासून नातीचे संरक्षण व्हावे म्हणून आजोबांनी तिला रेनकोटमध्ये घेतले होते. मात्र, अचानक त्यातून ती निसटली आणि नाल्यात पडली. 

दुर्दैवी रिषिकाची आई योगिता ही भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील राहणारी आहे. पाच ते सहा महिन्यांची ही मुलगी असून तिचे नाव रिषिका ठेवण्यात आले होते. मात्र, तिचे बारसे केलेले नव्हते. त्यामुळे काही जण तिला दर्शिका या नावानेही हाक मारत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता शंकर रुमाल या बाळंतपणासाठी हैदराबाद येथून आपल्या माहेरी भिवंडीत आल्या होत्या. बुधवारी तिच्या नियमित तपासणीसाठी योगिता आपले वडील ज्ञानेश्वर पोंगुल यांच्या सोबत मुंबईला गेली होती. जाताना ते गाडीने गेले होते, स्टेशनवर दुपारी गर्दी नसल्याने मुंबईहून अंबरनाथ लोकलने ठाकुर्लीपर्यंत आले. कल्याण स्थानकात उतरून त्यांना भिवंडीला जायचे होते. मात्र, मुसळधार पावसाने रेल्वे सेवा बंद झाल्याने योगिता, वडील ज्ञानेश्वर हे चिमुकल्या रिषिकाला घेऊन रेल्वेमार्गातून चालत निघाले होते .

२० तास शोधले, गुरुवारी शोधकार्य थांबविले 

डोंबिवली : ठाकुर्लीच्या पुढे पत्रिपुलानजीकच्या नाल्यात मंगळवारी दुपारी रिषिका पडल्यानंतर तब्बल २० तास खाडीपात्रात तिचा शोध सुरू होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत तिचा शोध न लागल्याने अखेर एनडीआरएफने शोधकार्य थांबवले.

डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, त्या बाळाचा शोध कार्य बुधवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन यंत्रणा, एनडीआरएफ, लोहमार्ग पोलिसांमार्फत सुरू होते. गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुन्हा वेगवेगळ्या यंत्रणांनी शोध घेतला. कल्याण, डोंबिवली, भिवंडीकडील खाडी किनारा तसेच मुंब्रापर्यंत शोध घेतला. मात्र, रिषिकाचा ठावठिकाणी लागला नाही.

 एनडीआरएफचे २३ अधिकारी, कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी होते. दोन बोटींमधून त्यांनी शोध घेतला. लोहमार्ग पोलिसांनीही डोंबिवली, ठाकुर्ली भागात तीन तास शोध घेतला; अग्निशमन दलाच्या एका पथकाने मुंब्रा खाडीपर्यंत जाऊन शोध घेतला. लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, एनडीआरएफ युनिटचे योगेशकुमार शर्मा यासह अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू होते.

 कचोरे येथील ग्रामस्थांनी देखील शोधकार्यात मदत केली, बाळ पाण्यात पडल्याचे समजल्यापासून त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

एनडीआरएफ यंत्रणेसोबत मी स्वतः  सकाळपासून तीन तास घटनास्थळापासून डोंबिवली खाडी परिसरात बाळाला शोधायला गेले होते. तीन तास खाडी किनाऱ्यावरील गाळ, झाडी, कांदळवन, वनस्पती यात पाहणी केली. दुपारी ४ पर्यंत तरी शोध लागलेला नव्हता.
- अर्चना दुसाने, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग.

Web Title: The unfortunate story of Rishika, who suffers from physical defects since birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.