दुर्गम डोंगर रांगांत टॉवर उभारणीसाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा
By मुरलीधर भवार | Published: June 1, 2023 02:51 PM2023-06-01T14:51:10+5:302023-06-01T14:52:44+5:30
महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी.
कल्याण - महाराष्ट्र राज्याच्या विजेचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक ते सारे करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे. म्हणूनच दुर्गम डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाबाच्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीसाठी कंपनी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी.
प्रकल्पासाठी अंबरनाथ तालुका ते पनवेल तालुका यांच्या दरम्यान असणाऱ्या डोंगर रांगांच्यात उच्च वीज दाब वाहून नेणाऱ्या वाहिन्या आणि टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. साधारण पणे १४ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या या दुर्गम डोंगर रांगांच्यातून जाणार आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत टॉवर उभारणीचे काम करावे लागते.कितीही खडतर परिस्थिती असली तरीही प्रकल्प वेळेत पूर्ण झालाच पाहिजे या विजिगिषु वृत्तीने कंपनी अत्याधुनिक विकसन प्रणालीचा अवलंब करत आहे.
या प्रकल्पाचे राष्ट्रीय महत्व ध्यानात घेता तो वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.म्हणूनच या साऱ्या पार्श्वभूमीवर स्टरलाईट पॉवर अंतर्गत मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प डोंगर प्रदेशातील कन्स्ट्रक्शन साईट वर अवजड साहित्य पोहोचविण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टर चा वापर करत आहे. हे हेलिकॉप्टर दिवसात साधारण पणे बेस वरून ५० ते ६० फेऱ्या मारत टॉवर उभारणीचे साहित्य प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन साईट वर पोहोचवत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंग वाडी येथील हेलिबेस चे ऍव्हेशन हेड राहुल उनियाल यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि या प्रकल्पाचे साठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर हे उत्कृष्ट दर्जाचे असून ते चालविणाऱ्या पायलट्स कडे हजारो तासांचा हेलिकॉप्टर उडविण्याचा अनुभव आहे.आमच्या पायलट्सनी यापूर्वी भारतीय सेनेसाठी सुद्धा आपली सेवा दिलेली आहे. अगदी माउंट एव्हरेस्ट च्या सर्वोच्च बिंदूपर्यंत उडण्याची या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे.
ते पुढे म्हणाले कि,हेलिकॉप्टर च्या खाली मजबूत साखळीला हुक बांधून त्याच्या सहाय्यतेने टॉवर उभारणीसाठी लागणारे साहित्य दुर्गम ठिकाणी पोहोचविले जाते. आत्ताचे तापमान आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ८०० ते ८५० किलोग्रॅम वजनाचे साहित्य एका वेळेस उचलून डोंगरातील साईट वर पोहोचविले जाते. उड्डाण करताना सुरक्षेच्या साऱ्या नियम आणि निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. या प्रक्रियेत सहभागी हर एक कर्णाचऱ्याला रोज संचलन आयोजित करून सुरक्षा राखण्याचे खडतर प्रशिक्षण दिले जाते.उड्डाण क्षेत्रातील निष्णात अधीकारी या साऱ्या प्रक्रियेची हाताळणी करत असतात. वाहून न्यावयाचे साहित्य मजबूत साखळ्या,लोखंडी पट्ट्या यांनी बंदिस्त केले जाते जेणेकरून प्रत्यक्ष उड्डाण वाहतुकीच्या दरम्यान कुठलीही क्षती होऊ नये.प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे ध्येय्य डोळ्यापुढे ठेऊन आम्ही सारे काम करत आहोत तसेच हेलिकॉप्टर चा वापर करत प्रकल्प उभारणी केल्याने पर्यावरण रक्षण देखील होत आहे. दुर्गम ठिकाणी टॉवर उभारताना इतर वेळी रास्ता बनवून साहित्य पोहोचवावे लागते,त्यात झाडांची कत्तल होते. वन्यजीवांच्या नैसर्गिक निवाऱ्यांना नुकसान पोहोचते. कित्येक वेळेस वन्य जीव प्राणास मुकतात. हेलिकॉप्टर च्या वापराने वन्य संपदा अबाधित राहाते.अतिरिक्त मनुष्य बाळाचा वापर टळतो,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेची बचत होते.
मुंबई ऊर्जा मार्ग हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून वाटेत येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करत प्रकल्प पूर्तीचे ध्येय्य साधण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे.