कल्याण न्यायालयाने दोघांना सुनावली सक्तमजुरीची शिक्षा
By सचिन सागरे | Published: October 4, 2022 03:09 PM2022-10-04T15:09:04+5:302022-10-04T15:10:03+5:30
सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे यांनी त्यांना मदत केली.
सचिन सागरे
कल्याण : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत एकाला जखमी करणाऱ्या सचिन दौलत भेरे आणि विकी विष्णु भेरे (दोन्ही रा. सावरोली) या दोघांना कल्याण अतिरिक्त व सत्र न्यायालाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
१९ जानेवारी २०१८ रोजी फिर्यादी शिवाजी सातपुते (रा. सावरोली, शहापूर ) यांचा मुलगा गावाजवळील मोकळ्या जागेत विकी तसेच इतर गावातील मुले क्रिकेट खेळत होते. खेळत असताना विकीने फिर्यादी यांच्या मुलाला चापट मारली. आपल्यासोबत घडलेला प्रकार मुलगा घरी जाऊन आपल्या काकाला सांगत होता. त्याचवेळी, हातात लोखंडी सळई, लाकडी दांडक्यासह घरात घुसलेल्या विकी आणि सचिन यांनी फिर्यादी यांचा भाऊ नारायण यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. सचिनने लोखंडी सळईने तर विकीने लाकडी दांडक्याने नारायण यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यानंतर तेथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजी यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. खोकराळे यांनी पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे यांनी त्यांना मदत केली.