गरबा खेळण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात वॉचमननेच मारला डल्ला
By मुरलीधर भवार | Published: October 21, 2023 06:57 PM2023-10-21T18:57:41+5:302023-10-21T18:58:01+5:30
गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.
कल्याण - गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचा वॉचमन गगन बहादूर आणि त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर हे दोघे नेपाळ पळून गेल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
येथील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय काल गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते . गरबा खेळून घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले . याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला . या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणारे गगन बहादुर आणि त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने इमारतीच्या डकमध्ये शिडी लावून पटेल यांच्या घराच्या बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजारांचा ऐवज चोरी केला. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे.