आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक
By मुरलीधर भवार | Published: June 6, 2024 05:00 PM2024-06-06T17:00:59+5:302024-06-06T17:01:42+5:30
या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे.
कल्याण-लोकल ट्रेनने दादरहून ठाण्याला जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला प्रवासात झोप लागली. झोपेमुळे ती थेट कसारा कारशेडला पाेहचली. तिला जाग येताच तिच्या लक्षात आले की, तिच्या जवळचा महागडा आयफोन आणि सोन्याची चैन चोरीला गेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे.
ठाण्यात राहणारी तरुणी दादर वरळी येथील एका बड्या हा’टेलमध्ये शेफचे काम करते. तिने तिचे काम आटोपून बुधवारी दुपारी दादर स्थानकातून लोकल ट्रेन पकडली. प्रवासात तिला झोप लागली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिने पाहिले की, कसारा कार शेडमध्ये पोहचली आहे. तिच्या लक्षात आले की, तिच्या जवळचा महागडा आयफोन आणि सोन्याची चैन गायब आहे. तिने कसारा स्थानकातून कल्याणला जाणारी लाेकल पकडली. गाडीत तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एका तरुणाला ताब्यात
घेतले होते. ते त्याची चौकशी करीत होती. त्याच्याजवळ महागडा मोबाईल आणि सोन्याची चैन कुठून आली. मात्र तो काही एक माहिती त्यांना सांगत नव्हता. ते त्याला घेऊन कल्याण रेल्वेपोलिस ठाण्यात पोहचले. तेव्हा ज्या तरुणीचा मोबाईल आणि चैन चोरीला गेली होती.
ती तरुणी देखील त्याच वेळी तक्रार देण्यास कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाली. तक्रार आणि चोर आमने सामने पोलिस ठाण्यावर आल्यावर चोरट्याचे बिंग फुटले. पोलिसांनी आशिष मकासुरे याला अटक केली आहे. आशिषला हा भांडूपला राहतो. त्याला वडिल नाही. त्याला आई आहे. आई आजारी आहे. आशिष काही तरी काम करुन आईच्या उपचारासाठी पैसे खर्च करतो. त्याला ते पैसे कमी पडतात. आईच्या उपचारासाठी आणखीन पैशाची गरज होती. त्याने तरुणीचा माेबाईल आणि चैन चोरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे करीत आहेत.
दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांनी आणखीन एक आरोपीला अटक केली आहे. ज्याचे नाव विशाल प्रसावधान असे आहे. या आरोपीने देखील कल्याण रेल्वे स्थानकातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरी केला होता. विशाल हा गुजरातला चालला होता. त्याने मोबाईल चोरी का केला ? याचा तपासही कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत.