बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकीची चोरी, आरोपी गजाआड
By प्रशांत माने | Published: October 4, 2022 05:24 PM2022-10-04T17:24:00+5:302022-10-04T17:25:46+5:30
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री आयरेगाव परिसरातील क्रांतीनगर चाळीत राहणा-या अमोल लोखंडे (वय ३२ )यांनी घराजवळील पोलीस चौकीच्या शेजारी त्यांची दुचाकी पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली होती.
डोंबिवली : एकिकडे दुचाकी चोरीचे प्रकार सातत्याने घडत असताना दुसरीकडे आज पहाटे एका दुचाकी चोरट्याला सापळा लावून अटक करण्यात रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले. अनुराग उर्फ अन्नू होर्शीळ (वय २१) रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, आयरे गाव डोंबिवली पूर्व, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने तो राहत असलेल्या परिसरातूनच एकाची दुचाकी चोरली होती. पोलिसांकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री आयरेगाव परिसरातील क्रांतीनगर चाळीत राहणा-या अमोल लोखंडे (वय ३२ )यांनी घराजवळील पोलीस चौकीच्या शेजारी त्यांची दुचाकी पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लोखंडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरटयाविरोधात गुन्हा नोंद झाला होता.
या गुन्हयाच्या तपासकामी डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, प्रशांत सरनाईक, सोमनाथ पिचड, वैजनाथ रावखंडे, नितीन सांगळे यांचे पथक गठीत केले होते. पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरून क्रांतीनगर झोपडपट्टीत राहणा-या अनुरागला रहात्या घरातून आज पहाटे पाच वाजता अटक केली. बनावट चावीच्या सहाय्याने त्याने त्या परिसरातील दुचाकी चोरल्याची माहीती पोलीस तपासात समोर आली. अनुरागने अजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत का? बनावट चावी त्याने कुठे बनविली याचा तपास पोलिसांचा सुरू आहे.