"...तर मी अपक्ष निवडणूक लढणार", शिंदे सेनेच्या शहर प्रमुखाने दिले संकेत, महायुतीत वाढले टेन्शन 

By मुरलीधर भवार | Published: October 18, 2024 02:39 PM2024-10-18T14:39:24+5:302024-10-18T14:40:44+5:30

भाजप आमदार गायकवाड आणि शहर प्रमुख गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही.

"...Then I will contest independent elections", Shinde Sena's city chief Mahesh Gaikwad hinted, tensions rise in Mahayuti, Kalyan | "...तर मी अपक्ष निवडणूक लढणार", शिंदे सेनेच्या शहर प्रमुखाने दिले संकेत, महायुतीत वाढले टेन्शन 

"...तर मी अपक्ष निवडणूक लढणार", शिंदे सेनेच्या शहर प्रमुखाने दिले संकेत, महायुतीत वाढले टेन्शन 

कल्याण - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिले आहेत. महेश गायकवाड यांनी बंडाचे संकेत दिल्याने कल्याण पूर्वेतील महायुतीचे टेन्शन वाढले आहे. हा पेच सोडविण्यासाठी महायुतीचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे आहे.

भाजप आमदार गायकवाड आणि शहर प्रमुख गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. द्वारली येथील एका जमीनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना फेब्रुवारी २०२४ मध्ये घडली. या गोळीबार प्रकरणी आमदार गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. आमदार गायकवाड यांना जामीन मिळालेला नाही. 

दरम्यान, आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रीय झाल्या. त्यांना भाजपने विधानसभा प्रमुख पद दिले आहे. आमदार गायकवाड यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी विकास कामांची भूमिपूजने केली. तसेच पक्षाच्या बैठका, कार्यकर्मासह शहरातील अन्य विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर कल्याण पूर्वेतून शिंदे सेनेचे शहर प्रमुख गायकवाड इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आमदार गायकवाड यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

आमदार गायकवाड हे कल्याण पूर्व मतदार संघात गेली १५ वर्षे आमदार होते. त्यांनी गेल्या १५ वर्षात विकास कामे केली नाहीत. शहरात पाणी समस्या, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडीची समस्या, शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे नागरीक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा आमदार गायकवाड यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे शहर प्रमुख गायकवाड यांनी सांगितले.

एकीकडे शहर प्रमुख गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. तर शिंदे सेनेकडून गायकवाड यांच्यासह निलेश शिंदे आणि विशाल पावशे हे देखील इच्छूक आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभेची जागा महायुतीच्या जागा वाटपात कोणाच्या वाट्याला जाते. हे अद्याप ठरलेले नाही. त्या आधीच कल्याण पूर्वेतील महायुतीत टेन्शन वाढले आहे. त्यावर महायुतीचे पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतात? याकडे महायुतीसह विरोधी पक्षाचे लक्ष लागले आहे.

Web Title: "...Then I will contest independent elections", Shinde Sena's city chief Mahesh Gaikwad hinted, tensions rise in Mahayuti, Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.