'तडा' नाही, हा तर 'काळा कपडा'; गांधारी पुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:34 PM2021-07-27T14:34:23+5:302021-07-27T14:34:48+5:30
सोमवारी रात्री अचानक हा पूल वाहतुकीसाठी करण्यात आला होता बंद.
कल्याण - कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस पडला तसेच पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. २ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे गांधारी पुलाच्या पिलरला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याच सांगत सोमवारी रात्री अचानक हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मंगळवारी पीडब्युडीच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची होडीतून पाहणी केली. यावेळी कोणत्याही प्रकारचे तडे गेले नसल्याची बाब समोर आली. तसेच एका पिलरला मोठा काळा कपडा अडकला होता. लांबून हा कपडा नसून पिलरला तडा गेल्याचा भास होत होता. मात्र प्रत्यक्षात हा कपडा असल्याची वस्तुस्थिती समोर आली.
पीडब्युडीच्या अधिका-यांनी मंगळवारी संपूर्ण पुलाची पाहणी केली. यावेळी तडे गेले नसल्याची बाब समोर आली. तसेच एका पिलरवर काळा कपडा अडकला होता. त्यामुळे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पीडब्युडीच्या अधिका-यांची दुसरी टीम बुधवारी पुन्हा या पुलाची पाहणी करणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती पीडब्युडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तुर्तास हा पूल वाहतुकीसाठी बंदच असून याठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि पोलीस उपस्थित आहेत. त्यामुळेपडघ्याकडे जाणाऱ्या वाहनांना भिवंडी बायपासमार्गे वळसा घालून जावे लागणार आहेत . तर गांधारी पुलापलीकडील सोसायटीमध्ये राहणारे काही जण चालत आपल्या घरी जात असल्याची बाब निर्दशनास आली.