गली गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है, गृहमंत्र्यांविरुद्ध भाजपाचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:34 AM2021-03-21T10:34:20+5:302021-03-21T10:35:29+5:30
माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत.
डोंबिवली : परमवीर सिंग हे आयपीएस अधिकारी असून मुंबई आयुक्त असलेले देशभरातील मानाचे पद आहे, त्या पदावरील व्यक्ती जेव्हा आघाडी सरकार विरोधात गृहमंत्री 100 कोटींची मागणी करतात असे लेखी व्यक्तव्य करतात तेव्हा ते गांभीर्याने घ्यायला हवे, त्याची त्रयस्थ पातळीवरून चौकशी व्हायला हवी अशी मागणी भाजपच्यावतीने प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.
माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, राज्यातील भाजपा आक्रमक झाली आहे.
रविवारी भाजपच्यावतीने डोंबिवलित इंदिरा गांधी चौकात राज्य सरकार विरोधात निदर्शन करण्यात आली. यावेळी, परमवीर सिंग या व्यक्तीच्या नव्हे तर ते ज्या पदावर आहेत त्या पदाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, त्याना सहकार्य आम्ही करणार अशी भूमिका भाजपा नेत्यांनी बोलून दाखवली. तसेच, ठाकरे सरकार हाय हाय, 100 कोटींचा भ्रष्टाचार ही ठाकरे सरकारची मिलीभगत आहे, गली गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी पक्षाचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, नंदू परब, पूनम पाटील, संजय विचारे, राजेश म्हात्रे, राजन अभाळे, विषु पेडणेकर मंदार हळबे यांच्यासह विवध पदकाधिकारी, महिला, पुरुष कार्यकर्ते आदी उपस्थित होते.