नागरीकांना या ३२ सेवा दिलेल्या मुदतीत प्राधान्याने द्याव्यात; केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश
By मुरलीधर भवार | Published: June 14, 2023 04:45 PM2023-06-14T16:45:27+5:302023-06-14T16:47:17+5:30
हे आदेश कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कल्याण- महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेशानुसार ३२ प्रकारच्या विविध सेवांचे कामकाज अतिशय दक्षतेने आणि जबाबदारीने विहीत मुदतीत करावे, असे आदेश कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या सेवा नागरीकांना प्राधान्य क्रमाने द्याव्यात -
मिळकती हस्तांतरण करणे, थकबाकी नसल्याचा दाखला, जन्म दाखला, मृत्यू दाखला, इमारतींना नळ जोडणी, विवाह प्रमाणपत्र देणे, मालमत्ता उतारा, जलनि:सारण नोंदणी देणे, इमारत बांधकाम परवाना/प्रारंभ प्रमाणपत्र, जोता पूर्णत्वाचा दाखला, झोन दाखला देणे, भेागवटा प्रमाणपत्र देणे, भाग नकाशा देणे, विविध व्यवसायाकरीता ना हरकत दाखला, विविध व्यवसायाकरीता अंतिम ना हरकत दाखला या १५ विविध प्रकारच्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार अधिसुचित करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त नळ कारागीर , प्लंबर यांना लायसन्स देणे, प्लंबर लायसन्स नुतनीकरण, सदोष मीटर बाबत तक्रार दाखल करणे, पाण्याच्या दाबाबाबत तक्रार दाखल करणे, अनधिकृत नळ जोडणी तक्रार , थकबाकी नसल्याचा दाखला, पाण्याच्या दर्जाबाबत तक्रार दाखल करणे, व्यवसाय व साठा परवाना, सर्व परवाने, परवानग्या नुतनीकरण (१ वर्षाने), नळ जोडणीचे मालकी बदलणे, नळ जोडणी खंडीत करणे, परवाना रद्द करणे, मिळकत कराची डुप्लीकेट बील देणे, मिळकत कर भरणे, मिळकत कराची डुप्लीकेट पावती देणे, पाणी बिल भरणे, डुप्लीकेट पाणी बिल देणे अशा १७ विविध प्रकारच्या महानगरपालिकेमार्फत देण्यात येत आहेत.
कसूर आढळल्यास काय होईल कारवाई -
या सेवा नागरिकांना पुरविण्याच्या त्यांची अंमलबजावणी करणारे पदनिर्देशित अधिकारी तसेच ती सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचा दृष्टीने प्रथम अपिलिय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसुचित करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. शासन निर्देशानुसार या नागरी सेवांचे कामकाज प्राधान्याने हाताळावयाचे असल्याने याबाबतचे गांर्भीय लक्षात घेवून, तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी. यात कसूर आढळून आल्यास संबंधित अधिकारी व्यक्तिश: जबाबदार असतील. अशा जबाबदार अधिका-यांविरुध्द्व संबंधित प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी अधिसूचनेतील तरतुदीनुसार यथायोग्य कायदेशीर कार्यवाही पार पाडावी, असे आदेश महापालिका आयुक्त दांगडे यांनी काढले आहेत.