प्रवाशांना लुटायला ‘ते’ यायचे थेट तामिळनाडूहून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:27 AM2024-05-06T08:27:34+5:302024-05-06T08:27:48+5:30
चौघांना अटक; १२ गुन्हे उघडकीस, कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : रेल्वे प्रवाशांना लुबाडण्याच्या उद्देशाने मुंबईत येणाऱ्या तामिळनाडू राज्यातील वेल्लूर येथील उदयराजा पालियान गावातील चौकडीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने सापळा रचून अटक केली. ही चौकडी चोरी करण्यासाठी मुंबईला आली होती. सत्यराज ओंथुरगा, कृष्णा गणेश, शक्तिवेल अवालुडन, गणेश सेल्वम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौकडीकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून ११ महागडे मोबाइल, एक लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक अर्षद शेख, पोलिस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला. तपासादरम्यान सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सापळा रचला. चोरी करण्यास आलेल्या कृष्णा, अवालुडन आणि गणेश यांना अटक केली.