कल्याण पश्चिमेला नमो चषक स्पर्धेमध्ये तीस हजार खेळाडू झाले सहभागी - नरेंद्र पवार
By अनिकेत घमंडी | Published: February 16, 2024 04:15 PM2024-02-16T16:15:03+5:302024-02-16T16:15:33+5:30
नमो चषक अंतर्गत सुरू असणाऱ्या खो खो स्पर्धेमध्ये पवार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले.
डोंबिवली: स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सध्या नमो चषक स्पर्धा सुरू आहेत. त्यानूसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित नमो चषकाच्या विविध स्पर्धांमध्ये तीस हजार खेळाडूंनी सहभाग घेतल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शुक्रवारी दिली.
नमो चषक अंतर्गत सुरू असणाऱ्या खो खो स्पर्धेमध्ये पवार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. घे पंगा कर दंगा या ब्रिद वाक्याखाली कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून नमो चषक अंतर्गत विविध स्पर्धा खेळवल्या जात आहेत. पवार आणि भाजयुमोच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला, बुद्धीबळ, फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, 100 /400 मीटर धावणे, बॅडमिंटन, एकांकिका, वक्तृत्व, नृत्य आदी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आजपासून नूतन विद्यालयाच्या मैदानात खो खोची स्पर्धा सुरू झाली असून ती दोन दिवस चालणार आहे. पुढील दिवसांत कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, एकांकिका, गायन, रांगोळी, संगीत खुर्ची या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. तसेच आतापर्यंत झालेल्या विविध खेळांमध्ये शालेय विद्यार्थी आणि इतर संस्थांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. पवार खेळले खोखो नूतन विद्यालयाच्या मैदानात शुक्रवारपासून खो खो स्पर्धेला सुरुवात झाली. त्यामध्ये पवार यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत त्यांच्यातील खेळाडू वृत्तीची चुणूक दाखवली. त्यांनी त्यांच्या शालेय जीवनात खो खो खेळत मैदान गाजवले होते, त्याच जुन्या आठवणी पवार यांनी आपल्या खेळातून पुन्हा जागवल्याचे सांगण्यात आले.'
या खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, महीला मोर्चा प्रदेश सचिव मनीषा केळकर, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जून म्हात्रे, खो-खो स्पर्धा प्रमूख भरत कडाली आदींसह मान्यवर उपस्थित होते.