ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप
By मुरलीधर भवार | Published: June 16, 2023 06:48 PM2023-06-16T18:48:34+5:302023-06-16T18:49:04+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी आठ कोटीची निविदा काढली आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी आठ कोटीची निविदा काढली आहे. महापालिकेकडून नालेसफाई केली जात नाही. ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई आहे असा गंभीर आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
आमदार गायकवाड यांनी सांगितले की, नालेसफाईच्या कामाची निविदा मे महिन्याचा आधी काढली पाहिजे. महापालिकेने निविदा मे अखेरीस काढल्या. त्यामुळे नालेसफाई उशिरा सुरु झाली आहे. आठ कोटी रुपये खर्च करुन नालेसफाई केली जात असली तरी ही नालेसफाई नसून महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली जात आहे.
नालेसफाई करीत असताना नाल्यातील गाळ रस्त्याच्या लगत काढून ठेवला जातो. हाच गाळ जोराचा पाऊस आल्यावर पुन्हा नाल्यात जाणार. नालेसफाई योग्य प्रकारे केली जात नाही. नालेसफाई अभावी घाण पाणी रस्त्यावर आणि नारीकांच्या घरात शिरते. अधिकारी मात्र एसी गाडीतून फिरतात. अधिकारी नालेसफाई न करता कंत्राटदाराकडून आलेले पैसे वाटून घेतात. अधिकाऱ््यांच्या मनमानी कारभाराचा फटका सामान्य नागरीकांना पावसाळयात बसतो याकडे आमदार गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.