यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 09:56 AM2023-05-26T09:56:06+5:302023-05-26T09:56:19+5:30
कल्याण - डोंबिवलीचा निकाल ८७.६५%; ऑनलाइन निकालामुळे शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२३मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. कल्याण - डोंबिवली शहराचा निकाल ८७.६५ टक्के लागला आहे. मुलींचा गुणवत्तेचा टक्का ८९.५५, तर मुलांचा ८४.९१ इतका आहे.
दोन्ही शहरात ९०६ केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी २० हजार ६३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २० हजार ५६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यात २ हजार १४६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. तर, ५ हजार १२४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७ हजार ७४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३ हजार १३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कल्याण - डोंबिवलीतील २८ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ऑनलाइन निकालामुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयात सकाळपासून होणारी गर्दी, धाकधूक यावेळी कोठेही
जाणवली नाही.
गुरुनानक इंग्लिश हायस्कूलची परंपरा कायम
कल्याण पश्चिमेतील गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाचा बारावी कॉमर्सचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. मागील पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून ही शंभर टक्के यशाची परंपरा अशीच सुरू असल्याचे प्राचार्या बलजित कौर मारवाह यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी वेळोवेळी सहकार्य करतात.
या सर्वांनी मिळून मेहनत घेत यातूनच विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने आणि मेहनतीने हे यश संपादन
करण्यात महाविद्यालय यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.