त्या ९ गाड्यांना मिळणार कसारा स्थानकात पुन्हा थांबा; कोविडपासून बंद केलेले थांबे
By अनिकेत घमंडी | Published: August 22, 2023 01:57 PM2023-08-22T13:57:22+5:302023-08-22T13:58:52+5:30
प्रवासी संघटनांचा पाठपुरावा
डोंबिवली: भारतीय रेल्वे प्रशासनाने कोविड काळात त्या कालावधीत अनावश्यक असलेले रेल्वे थांबे काढून निवडक लांबपल्याच्या गाड्या चालवल्या होत्या. मात्र जसा कोविड कमी झाला तशी रेल्वेची लांबपल्याची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी त्यावेळी बंद केलेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू न झाल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय होते. मुंबई कल्याण नाशिक मार्गावरील कसारा स्थानकात देखील ९ गाड्यांचे थांबे बंद केले होते, ते आता सुरू करण्याची सकारात्मक मानसिकता रेल्वेने दाखवली आहे.
गाडी थांबवणार पण तारीख नाही सांगणार अशी भूमिका रेल्वेने घेतली असल्याने त्या तारखा जाहीर कराव्यात अशी मागणी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असो.चे अध्यक्ष शैलेश राऊत, सचिव उमेश विशे यांनी केली आहे. ही।मागणी।करताना त्यांनी मध्य रेल्वेचे आभार मानले असून प्रवासी संघटनेच्या मागणीला दीड वर्षाने न्याय मिळाला असून ते काम तातडीने करावे असे राऊत म्हणाले. त्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी राऊत यांच्या संघटनेने आणि उपनगरी रेल्वे प्रवासी एकता सँस्था, के३ आदींनी देखील प्रयत्न केले होते असे सांगण्यात आले.
संघटनेने राज्यराणी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई मनमाड स्पेशल ट्रेन, सेवाग्राम एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, पुणे भुसावळ ट्रेन आदी गाड्यांचे थांबे कसारा स्थानकात पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मध्य रेल्वेने हा गाड्यापैकी काही गाड्या आणि तपोवन एक्स्प्रेस, कोचुवेली, पटना एक्स्प्रेस, निझमुद्फिन एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस आदी गाड्यांना कसारा स्थानकात थांबा देण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. तसे पत्र संघटनेला।पाठवले असून लवकरच थांबा देण्याच्या विचाराधिन असा रिमार्क दिला आहे. त्यामुळे संघटनेसह सामान्य प्रवाशांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.