जबरी चोरीच्या गुन्हयातील तिघा सराईत आरोपींना ‘मोक्का’ची तडी; रामनगर पोलिसांची कारवाई
By प्रशांत माने | Published: January 10, 2024 05:47 PM2024-01-10T17:47:42+5:302024-01-10T17:47:49+5:30
अक्षय कचरू अहिरे, सनी ऋषीपाल तुसाबंड आणि सागर उत्तम चव्हाण अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
डोंबिवली: सोनसाखळी चोरी, शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणे, खंडणी मागणे, मारामारी, घातक शस्त्राने दहशत माजविणे, हल्ला करणे या सातत्याने घडणा-या गुन्हयांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे गेल्या वर्षात पोलिसांनी मोक्का कायदयांतर्गत कारवाई करून मोडले असताना यंदाच्या वर्षातही अशा माफियागिरींचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. जबरी चोरीच्या गुन्हयातील तिघा सराईत आरोपींविरोधात येथील रामनगर पोलिसांनी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
अक्षय कचरू अहिरे, सनी ऋषीपाल तुसाबंड आणि सागर उत्तम चव्हाण अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय आणि सनी या दोघांनी १२ डिसेंबरला डोंबिवली पुर्वेकडील शेलार नाका येथे एकाला चाकू धाक दाखवून चिल्लाया तो काट डालेंगे अशी दहशत पसरवित त्याला लुबाडले होते. दरम्यान अक्षय याच्यावर सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, दुखापत, हद्दपार आदेशाचा भंग अशा प्रकारचे एकूण १६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सनी तुसाबंड याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर सागर चव्हाण याच्यावर जबरी चोरी व दुखापत असे २ गुन्हे दाखल आहेत. अक्षय अहिरे हा मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हयातून १८ महिने कालावधीकरीता तडीपार असताना तो तडीपारीचा आदेशाचा भंग करून त्याने त्याचे सहकारी सनी तुसाबंड व सागर चव्हाण याच्या मदतीने स्वत:चे व टोळीचे आर्थिक फायदयाकरीता वेगवेगळया गुन्हयात वेगवेगळया साथीदारांची मदत घेवून हिंसाचाराचा वापर करून दहशत पसरवली आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत अशी माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांनी दिली.