दारु पिऊन वाहन चालविले, खावी लागली जेलची हवा; कोर्टानं सुनावली शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:49 PM2022-03-30T22:49:59+5:302022-03-30T22:50:17+5:30
तिघा मद्यपींना पाच दिवसांची कैद, कल्याण सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा
कल्याणः धुलीवंदनाच्या दिवशी दारु पिऊन वाहन चालविणा-या तिघा मद्यपींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शहर वाहतूक उप शाखा कल्याणच्या पोलिसांनी आज तिघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दंड न भरल्याने त्यांना पाच दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.
१८ मार्चला धुलीवंदनाच्या दिवशी वाहतूक पोलीसांच्या वतीने ड्रंक अँड ड्राइव्ह ची विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर वाहतूक उप शाखा कल्याणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहीमेत २३ मद्यपी चालकांची धरपकड करण्यात आली होती. यातील १६ वाहनचालकांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावताना सहा महिन्यांसाठी संबंधितांचा वाहन परवाना रद्द केला तर चार जणांना वाहन परवाना नसल्याने दहा हजारासह अतिरिक्त पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. दरम्यान उर्वरित तिघांना आज न्यायालयात हजर केले होते. दहा हजाराचा दंड न भरल्याने त्यांना पाच दिवस साधी कैद ही शिक्षा ठोठावली. कोरोना चाचणीनंतर त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती वपोनी तरडे यांनी दिली.