साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या चौघांपैकी तिघांना अटक; मुख्य आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 08:02 PM2024-08-05T20:02:40+5:302024-08-05T20:02:59+5:30
६ लाख ९६ हजाराचा ५६७ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत.
प्रशांत माने/डोंबिवली लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: घरकाम करणा-या नोकराने आपल्या तीन साथदारांसह घरफोडी करून साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जुलैच्या मध्यरात्री घडली होती. या गुन्हयातील तीघांना अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला नोकर सागर विश्वकर्मा उर्फ थापा. रा. नेपाळ हा अदयाप फरार आहे. अटक आरोपींकडून ६ लाख ९६ हजाराचा ५६७ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लीलबहादूर लालबहादूर कामी , टेकबहादूर जगबहादूर शाही, मनबहादूर रनबहादूर शाही अशी अटक आरोपींची नावे आहेत. सागर थापाने या साथीदारांच्या मदतीने तो नोकरी करत असलेल्या कुंदन हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या घरात घरफोडी करून सोने चांदिचे दागिने, १० विविध कंपन्यांची घडयाळे आणि रोकड असा एकुण १५ लाख ५२ हजार ८०७ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्हयाच्या तपासकामी वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे ) गहीनीनाथ गमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक दिपविजय भवर, अमोल आंधळे यांसह अन्य पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचे पथक नेमले होते. कुंदन म्हात्रे यांच्या घरी काम करणारा नोकर सागर थापा हा घटनेनंतर बेपत्ता झाला होता. त्यामुळे तो संशयाच्या घे-यात सापडला. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरांचा आधार घेतला असता चोरीच्या घटनेच्या दिवशी एकजण रिक्षा पकडून शीळफाट्याच्या दिशेने निघुन गेल्याचे दिसून आले. पोलिसांचे पथक शीळफाट्याला पोहचले. शीळ फाट्याच्या रिक्षा स्टॅण्डवर त्यांनी तेथील रिक्षा चालकांना सागर थापाचे फाेटो दाखविले. त्यावेळी एका रिक्षा चालकाने प्रवाशी म्हणून सागरला नवी मुंबईतील कामोठे येथे सोडल्याची माहिती दिली.
पोलिसांनी सागरचे घर शोधले परंतू त्याठिकाणी तो नव्हता. पोहचले. त्या घरात राहणा-या लील बहाद्दूर कामी याच्याकडे चौकशी करता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्याकडे सखोल चौकशी करता सागर हा त्याचा मेहुणा असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात पुढे सागरच्या मदतीनेच लीलबहाद्दूरने टेकबहाद्दूर आणि मनबहाद्दूर यांच्यासह कुंदन म्हात्रे यांच्या घरात चोरी केल्याचे उघड झाले. लील बहाद्दूर याच्या वसई आणि तेलंगणा येथे तीन घरफोडीचे गुन्हे दाखल असून सागरचा शोध सुरू असल्याची माहीती पोलिसांनी दिली.