शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून आता राष्ट्रवादी पिंजून काढणार ठाणे जिल्हा
By मुरलीधर भवार | Published: September 27, 2023 02:47 PM2023-09-27T14:47:25+5:302023-09-27T14:47:55+5:30
या अभियानाची सुरुवात 30 सप्टेंबरला मुरबाडमधील माळ गट तर १ ऑक्टोबरला वैशाखरे गटातून दिपक वाकचौडे आणि नामदेव गायकवाड यांच्या पुढाकाराने केली जाणार आहे.
कल्याण- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहीत पवार यांच्या झंजावाती दौऱ्यानंतर आता शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा पिंजून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. मुरबाडमधील माळ आणि वैशाखरे गटापासून या संपर्क अभियानाचा प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे युवा आणि फायर ब्रँड नेते आमदार रोहीत पवार यांनी नुकताच कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा झंजावाती दौरा केला. रोहीत पवारांच्या या दौऱ्यानंतर इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले असून पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपले आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
मधल्या काळात अजित दादांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेला कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील पवार साहेबांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद संपर्क अभियान राबवणार असल्याचे महेश तपासे यावेळी म्हणाले.
या अभियानाची सुरुवात 30 सप्टेंबरला मुरबाडमधील माळ गट तर १ ऑक्टोबरला वैशाखरे गटातून दिपक वाकचौडे आणि नामदेव गायकवाड यांच्या पुढाकाराने केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांचे विचार पोहोचवण्याचे आणि त्याद्वारे आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ग्राम सदस्य आजी माजी सरपंच व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते जोडण्याचे काम केले जाणार आहे. तसेच शरद पवारांनी गेल्या ५० - ५५ वर्षांत केलेली विकासकामे, राजकीय विषय, सामाजिक विषय आदी मुद्दे या अभियानाद्वारे पोहचवले जाणार असल्याचेही तपासे यांनी यावेळी स्पष्ट केले.