वाहनचालकांना नियमांचे ‘वावडे’; तासाभरात ४९३ जणांवर कारवाई
By प्रशांत माने | Published: June 23, 2023 04:48 PM2023-06-23T16:48:18+5:302023-06-23T16:48:28+5:30
वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
कल्याण: शहर वाहतूक शाखा कल्याण पश्चिम यांच्यावतीने शुक्रवारी दुर्गाडी चौक व खडकपाडा सर्कल याठिकाणी फ्लॅश डिप्लॉयमेंट करून नियम मोडणा-या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संबंधित ठिकाणी सकाळी ११ ते १२ या तासभर चाललेल्या या विशेष मोहीमेत ४९३ वाहनचालकांवर कारवाई करून एकुण पाच लाख ७१ हजार ८०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
या मोहीमेत शहर वाहतूक शाखा कल्याणचे पोलिस निरीक्षक गिरीश बने यांच्यासह दोन अधिकारी, ११ पोलिस कर्मचारी आणि आठ वॉर्डन सहभागी झाले होते. विना हेल्मेट असलेले २६१, विना सीट बेल्ट ३४, ब्लॅक फिल्म लावणारे ३ जण, ट्रीपल सीट जाणारे २ जण, फ्रंट सीट बसविणारे ११ जण, विना परवाना २, गणवेश न घालणे १० जण, मोबाईलवर बोलणारे चार आणि सिग्नल तोडणारे १४३ व इतर २३ जण अशा ४९३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
संबंधितांवर आकारलेल्या पाच लाख ७१ हजार ८०० या एकुण दंडापैकी चार हजार ७०० रूपयांचा दंड जागेवरच वसूल केला गेला अशी माहीती पोलिस निरीक्षक बने यांनी दिली. या मोहीमे दरम्यान वाहनचालकांचे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन देखील करण्यात आले. तसेच विशिष्ट वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहीती देऊन केडीएमसी सिग्नल वरील पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमदवारे जनजागृती देखील करण्यात आल्याकडे बने यांनी लक्ष वेधले.