हवेतील प्रदूषणामुळे वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर, पीयूसी न करणाऱ्या ६४ वाहन, चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई
By मुरलीधर भवार | Published: November 16, 2023 08:20 PM2023-11-16T20:20:03+5:302023-11-16T20:20:20+5:30
अशा वाहनांची झडाझडती घेत वाहतूक पोलिसांनी ६४ वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवलीत प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावल्याने कल्याणमधील वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर आले आहे. ज्या वाहनांनी पीयूसी केलेले नाही. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. अशा वाहनांची झडाझडती घेत वाहतूक पोलिसांनी ६४ वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.
या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक गिरीष बने यांनी ही माहिती दिली आहे. ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. या तपासणीतून ६४ वाहनांनी पीयूसी केलेले नाही. पीयूसी करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. त्यासाठीही वाहन चालकांची अनास्था दिसून आली. अशा वाहन चालकांकडून आ’नलाईन चलनाद्वारे प्रत्येक वाहनाला ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. पीयूसी तपासणी मोहिम सुरुच राहणार आहे असे पोलिस निरिक्षक बने यांनी सांगितले.
१ नोव्हेंबरपासून शहरातील हवेची गुणवत्ता खालावली होती. त्यानंतर गेले तीन दिवसात दिवाळीनिमित्त नागरीकांनी फटाके फोडले. त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखीन खालावत राहिली. तसेच वातावरणात फटाक्यांच्या प्रदूषित धुरामुळे नागरीकांना त्रास जाणवला. हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगलेच फटकारले होते. ८ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयात पोलिस प्रशासन आणि महापालिका अधिकारी वर्गाची एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत धूळीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पाना नोटिसा बजावण्याचे ठरविले होते. तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनामुळे होणाऱ््या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठोस कारवाई करावी असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी ११ नोव्हेंबरपासून सुरु केलेल्या कारवाईत सातत्य ठेवले आहे.