चौथ्या मुंबईसह कल्याण डोंबिवलीच्या वाहतूकीचा वेग वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:34 PM2021-11-08T17:34:44+5:302021-11-08T17:35:28+5:30
कल्याण-तळोजा मेट्रोसह प्रमुख जोड रस्त्यांसाठी सल्लागाराची नेमणूक; डोंबिवलीतील ११० तर उल्हासनगरातील १७६ कोटीच्या रस्ते कामांना मिळणार गती
कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यासोबत कल्याण लोकसभा मतदार संघातील वाहतूकीचा वेग वाढविण्यासाठी नुकतीच एक बैटक पार पडली. चौथ्या मुंबई म्हणून ओळखल्या जाणा:या अंबरनाथ, बदलापूर शहरांना जोडून घेतले जाणार आहे. तसेच उल्हासनगर आणि डोंबिवलीतील रस्ते विकास कामांना गती दिली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीस कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर, उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अंबरनाथ नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ उपस्थित होते.
डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागतील रस्त्यांच्या कामासाठी खासदार शिंदे यांनी प्रयत्न केल्याने ११० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्याचबरोबर उल्हासनगरातील विविध रस्त्यांच्या विकास कामाकरीता १७६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या तांत्रीक मंजूरी मिळविण्यात यश आले आहे. यासाठी एमएमआरडीएकडे अहवाल सादर केला आहे. एमएमआरडीएकडून पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना आयुक्त श्रीनिवास यांनी संबंधित अधिकारी वर्गास दिल्या आहेत.
खोणी तळोजा रस्ता त महामार्ग क्रमांक चार रस्त्याला जोडणारा महत्वपूर्ण विकास रस्त्याची उभारणी काळाची गरज आहे. या रस्त्याचे सव्रेक्षण करुन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या रस्त्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. अंबरनाथ बदलापूर आणि मलंगगड परिसरातील नागरीकांना त्याचा थेट फायदा होईल.
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर अ वर्ग नगरपरिषदांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा एसपीव्ही अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन त्यावर समिती नेमण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी बैठकीत सांगितले. या कामालाही गती मिळणार आहे.