अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण
By सचिन सागरे | Published: August 7, 2023 04:36 PM2023-08-07T16:36:51+5:302023-08-07T16:37:09+5:30
कल्याण तालुक्यात प्रथमच झाले संपन्न
कल्याण : अन्न व औषध प्रशासन, ठाणे व हॉटेल व्यावसायिक संघटना, कल्याण यांचे संयुक्त विद्यमाने पश्चिमेकडील एका हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण सोमवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत आयोजित करण्यात आले होते. कल्याण तालुक्यात प्रथमच पार पडलेल्या या प्रशिक्षणाचा ६८ व्यावसायिकांनी लाभ घेतला.
अन्न व सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न पदार्थ उत्पादन, विक्री, साठा, वितरण करण्यासाठी प्रत्येक आस्थापनेत अन्न सुरक्षा पर्यवेक्षकाची हॉटेलमध्ये नेमणूक करणे आता कायद्याने बंधनकारक आहे. त्याबाबतचे फॉस्टॅक प्रशिक्षण हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आले. यावेळी, उपस्थित असलेल्यांना अन्न पदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता, साठ करण्याची पद्धत, लेबल वाचन व अन्न संबंधित कायद्याची विस्तृत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाअंती परीक्षा घेऊन त्यांना अन्न सुरक्षा पर्यवेक्षकाचे प्रमाणपत्र देण्यात आले. फॉस्टॅक ट्रेनर नागलक्ष्मी (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली) यांनी हे प्रशिक्षण दिले.
सदरचे प्रशिक्षण सहआयुक्त (अन्न, ठाणे ) सुरेश देशमुख व सहायक आयुक्त (ठाणे) व्यंकटराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. ठाणे कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र करडक व अर्चना वानरे यांनी यासाठी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी यांनी सहकार्य केले.
सदर प्रशिक्षण कल्याण तालुक्यात प्रथमच झाले असून यापुढे देखील असे प्रशिक्षण ४० ते ५० व्यावसायिकांची एक बॅच याप्रमाणे घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित असोसिएशन अध्यक्ष किंवा ग्रुप बनवून अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र करडक यांनी यावेळी केले.