एमआयडीसी निवासी भागात झाड कोसळले; याआधीही अनेक झाडे उन्मळून पडली
By अनिकेत घमंडी | Published: June 21, 2024 12:00 PM2024-06-21T12:00:44+5:302024-06-21T12:01:47+5:30
झाडांच्या फाद्यांची झालेली वाढ, त्यामुळे काही वेळा तो भार सहन न झाल्याने कधी कधी झाडे पडतात. या फांद्या महावितरणच्या उच्च दाबाचा वाहिन्यांना स्पर्श केल्याने वीज पुरवठा खंडित होत असतो.
डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागातील धर्मवीर आनंद दिघे उद्यानात शुक्रवारी एक मोठे झाड कोसळले. सुदैवाने या उद्यानात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर झाड पडले नाही. याबाबत माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी तत्काळ केडीएमसी अग्निशमन दलाला कळवून ते झाड बाजूला करण्यात आले आहे.
पर्यावरण प्रेमी राजू नलावडे यांनी त्यासंदर्भात चिंता व्यक्त करत सांगितले की, यापूर्वी एमआयडीसी निवासी भागात अनेक झाडे उन्मळून पडल्याचे पाहण्यास आले आहे. गुलमोहर, आकाशिया, रेन ट्री इत्यादी विदेशी जातीची झाडे मुख्यते पडत आहेत. काही दिवसापूर्वी मरणासन्न आणि सुकलेली काही झाडे तोडण्यासाठी केडीएमसी उद्यान विभागाला सांगण्यात आल्याचे त्यांनी सदर झाडे तोडण्याची कार्यवाही पूर्ण केली होती. सद्या पावसाळा चालू झाल्याने वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम चालू आहेत. वृक्षारोपण करतांना देशी जातीची झाडे म्हणजे वड, पिंपळ, जांभूळ, बदाम, चिंच, कडुलिंब इत्यादी पर्यावरणाला पूरक अशी झाडे लावावीत.
झाडांच्या फाद्यांची झालेली वाढ, त्यामुळे काही वेळा तो भार सहन न झाल्याने कधी कधी झाडे पडतात. या फांद्या महावितरणच्या उच्च दाबाचा वाहिन्यांना स्पर्श केल्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. शिवाय या अतिरिक्त फांद्यामूळे पथ दिव्यांचा प्रकाश जमिनीवर पडत नाही. अशा या कारणामुळे झाडांच्या फांद्या वेळचावेळी तोडणे आवश्यक आहे. परंतु केडीएमसी आणि महावितरण कडून ते नीट होताना दिसत नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने यावर त्वरित कार्यवाही होणे गरजेचे असल्याची मागणी नलावडे यांनी केली.