... तर कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:53 PM2021-10-21T19:53:24+5:302021-10-21T19:58:13+5:30
Dombivali News : मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे.
कल्याण - राज्यात ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. आता निवडणूका म्हटल्या की, मतदार यादी व त्यातील गोंधळ, मतदान केंद्रावरील संभ्रमाच वातावरण, यादीत नाव नसणं असे एक ना अनेक प्रकार समोर येतात. मात्र असे प्रकार टाळता येऊ शकतात. मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. असं झाल्यास मतदानाचा टक्का वाढू शकतो अस मतं जाणकारांनी व्यक्त केलंय.
निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या कल्याण डोंबिवलीतील पत्रकार संघासोबत आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव तथा तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय जाधव यांनी पॅनल पद्धत, मतदार यादी, मतदान इत्यादी विषयांवर भाष्य केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून 'मतदार यादीतील आपल्या नावांबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन देखील जाधव यांनी केलंय. आतापर्यंत झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या एक सदस्यीय पध्दतीने घेण्यात आल्या आहेत.
आताची होणारी निवडणूक ही त्रिसदस्यीय अर्थातच पॅनल पध्दतीने असणार आहे. त्यामुळे यापूर्वी आपल्याकडे असणारे 122 प्रभागांत बदल होऊन ते आता 41 असणार आहेत.यामध्ये 40 प्रभागात त्रिसदस्य ( 3 उमेदवार) तर उर्वरित एका प्रभागात 2 सदस्य असणार आहेत. तर आता तीन प्रभाग मिळून एक प्रभाग असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे 37 हजार मतदारांचा प्रभाग होऊ शकतो. त्यातही 10 टक्के मतदारांची संख्या ही कमी किंवा जास्त होऊ शकते. त्यामूळे प्रत्येक मतदाराला आता 3 सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचे संजय जाधव यांनी सांगितलं.
मतदान करण्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीत असण आवश्यक आहे. मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणाचा कार्यक्रम शासनातर्फे राबवण्यात येत असून महापालिका आणि शासकीय यंत्रणा त्यावर काम करत आहेत. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी आताच मतदार यादीतील नावे तपासून घ्यावीत, ही नावे योग्य ठिकाणी आहेत का, काही नावे कमी झाली असतील ती कमी करून घ्या, जी नावे वाढली असतील ती आणि 18 वर्षांवरील व्यक्तींची नावे ती त्यात समाविष्ट करून घ्या. जेणेकरून आगामी महापालिका निवडणुकीत मतदान कोणतीही अडचण येणार नाही असंही ते आवर्जून म्हणाले.
बहुतांश मतदार हे मतदानाच्या दिवशी जागे होतात. त्यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात. मग नजीकच्या दादा भाऊंचा आधार घेतला जातो. पण गोंधळ काही संपत नाही..त्यामुळे एक जागरूक मतदार होण्याचा संकल्प आताच करा. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी सुद्धा मतदार यादीचा अभ्यास केला तर मतदानाचा टक्का नक्की वाढेल यात शंका नाही.