'देशातील समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव', महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:46 PM2022-03-08T16:46:04+5:302022-03-08T16:46:50+5:30
Tushar Gandhi News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.
कल्याण - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.
कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधील गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ५ ते १२ मार्च दरम्यान युवा शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात देशभरातील विविध राज्यातून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थीत होते. तुषार गांधी यांनी सांगितले की, गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का तर त्याचे उत्तर नाही असे आहे. देसातील समस्या सुटल्या नाहीत. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गूलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात क्रांती घडवायची असेल तर शैक्षणिक क्रांती घडविणो गरजचे आहे. आपल्या देशात जिथे रोजगार आहे. तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे. त्याठिकाणी रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळयादेखत पाहिली. कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते. हे भयावय चित्र भारतात दिसून आले.
महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधींना जाणून घेऊ शकता. उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्या देशातील तरुणाच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर डॉक्टरला रोजगारीची शाश्वती नाही तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. देशाचे पंतप्रधान बोलतात की, इंजिनिअर झाला नोकरी नाही तर भजी तळा आणि ते विका. त्यांना भजी तळायचे होते. तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.