कल्याण मतदार संघातील ट्विस्ट कायम; उद्धव सेनेचे रमेश जाधवांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध
By मुरलीधर भवार | Published: May 4, 2024 02:50 PM2024-05-04T14:50:05+5:302024-05-04T14:50:38+5:30
आत्ता पक्ष प्रमुखांच्या आदेशाची प्रतिक्षा
कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेच्या उमेदवारी वैशाली दरेकर यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याच्या पाठाेपाठ उद्धव सेनेचे पदाधिकारी आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ट्वीस्ट निर्माण झाला. आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत दरेकर यांच्यासह अपक्ष उमेदवार जाधव यांचाही अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे हा ट्वीस्ट कायम आहे.
अर्ज वैध झाल्यानंतर जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला. त्याच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दाखळ केलेला अर्ज छाननी प्रक्रियेनंतर वैध ठरला आहे. आत्ता पुढे काय करणार असा प्रश्न जाधव यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, आत्ता पक्ष प्रमुख काय आदेश देतात. याची वाट पाहत आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत ६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तोपर्यंत पक्ष प्रमुख ठाकरे यांचा काय आदेश येतो. याकडे जाधव यांचे लक्ष लागून राहिले आहे. ६ मे राेजी जाधव उमेदवारी मागे घेतात की कायम ठेवतात. हे स्पष्ट होणार आहे.