सहा महिन्याच्या बाळाच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक, एमएफसी पोलिसांनी १२ तासात घेतला शोध
By सचिन सागरे | Published: June 9, 2024 01:39 PM2024-06-09T13:39:55+5:302024-06-09T13:40:33+5:30
बाळ चोरण्यामागे या दोघांचा नेमका उद्देश काय होता याचा पोलीस तपास करत आहेत
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: आईच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्याच्या बाळाला चोरून पोबारा करणाऱ्या दोघांना महात्मा फुले चौक पोलिसांनी १२ तासात अटक केली. बाळ चोरण्यामागे या दोघांचा नेमका उद्देश काय होता याचा पोलीस तपास करत आहेत.
पश्चिमेकडील मुरबाड रोड परिसरात आयेशा समीर शेख (२०) ही महिला सहा महिन्याचा मुलगा अरबाज याच्यासोबत शनिवारी फुटपाथवर झोपली होती. पहाटेच्या सुमारास आयेशाला जाग आली असता अरबाज बाजूला नसल्याचे पाहून तिने आसपासच्य परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, अरबाज सापडला नाही. अरबाजला पती समीर कुठे तरी घेऊन गेला असले असा संशय आल्याने तिने पतीकडे देखील याबाबत चौकशी केली. मात्र, त्याच्याकडे देखील मुलगा नसल्याने आयेशाने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केले. तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दिनेश भैय्यालाल सरोज (३५) आणि अंकितकुमार राजेंद्रकुमार प्रजापती (२५) या दोघांना ताब्यात घेतले. त्याचवेळी अरबाज याची उल्हासनगर येथील आरोपींच्या राहते घरातून सुखरूप सुटका केली.
आयेशा गाढ झोपली असल्याची खात्री करून अरबाजला उचलून नेल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या दोघांनी पोलीस तपासात दिली. कल्याण न्यायालयाने या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.