डोंबिवलीत सव्वा दोन लाखांच्या एमडी ड्रग्स सह दोघांना अटक
By प्रशांत माने | Published: November 29, 2023 07:25 PM2023-11-29T19:25:52+5:302023-11-29T19:26:07+5:30
दोघांकडून २ लाख ३२ हजार रूपये किमतीची ५८ ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एम.डी पावडर जप्त करण्यात आली आहे.
डोंबिवली : पूर्वेकडील खोणी पलावाच्या हद्दीत एम.डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा जणांना मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली. दोघांकडून २ लाख ३२ हजार रूपये किमतीची ५८ ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एम.डी पावडर जप्त करण्यात आली आहे. आर्शद करार खान आणि शादाबुद्दीन मोईनुद्दीन सय्यद (दोघांची वय २८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि २ लाख २३ हजार ४०४ रूपयांची रोकड असा एकुण ५ लाख ३० हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार अशी माहीती गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे यांना मिळाली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राम चोपडे आणि तारमळे यांचे पथक मिळालेल्या माहितीनुसार रवाना झाले. अंमली पदार्थ विक्री करणारे उच्चभ्रु गृहसंकुल असलेल्या पलावा सिटी गेट नं २ याठिकाणी आल्याची माहिती मिळताच दोघांना सापळा लावून अटक केली गेली. या कारवाईत पोलिसांना पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशनची देखील मदत मिळाली. अटक केलेला आर्शद हा पलावा फेज २ मधील फाउंटना येथे राहतो तर शादाबुद्दीन हा राजस्थान येथील शोर ग्रान लंगरखाना येथील राहणारा आहे. आर्शद याच्यावर मुंब्रा पोलिस ठाणे आणि नवी मुंबईतील ए.पी.एम.सी पोलिस ठाण्यात एम.डी पावडर बाळगल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तो अंमली पदार्थ जवळ बाळगुन विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेला एम.डी पावडरचा माल हा कोठे तयार केला आहे? कोणास विक्री केला आहे का? कोणास विक्री करणार होते? त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत काय? याबाबतचा तपास सुरू आहे. दोघा आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
एम.डी पावडर पुरवठ्याचे राजस्थान कनेक्शन?
शादाबुद्दीन हा राजस्थान येथील शोर ग्रान लंगरखाना येथील राहणारा आहे. त्यामुळे तो आर्शदला एम.डी पावडरचा माल आणुन दयायचा का? तो राजस्थान वरून माल आणायचा का? याबाबतही पोलिसांचा तपास चालू आहे