बैलांची तस्करी करणारे दोघे जेरबंद, बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
By सचिन सागरे | Published: May 28, 2023 03:37 PM2023-05-28T15:37:33+5:302023-05-28T15:38:50+5:30
दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे १३ बैल व ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
कल्याण : पडघा तळवली येथे एका ट्रकमधून बैलांची कत्तल व त्यांची खरेदीविक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या साजिद चौधरी व रेहान कुरेशी (दोघेही रा. जुन्नर, जि. पुणे) या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे १३ बैल व ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्याचा हद्दीतील आग्रारोडमार्गे पडघा, तळवली याठिकाणी एका ट्रकमधून काही बैलांना कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची बातमी पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांच्या पथकातील पोलीस हवालदार साळवी, प्रेम बागुल, परमेश्वर बाविस्कर, पोलीस नाईक चिंतामण कातकडे, रामदास फड यांनी साफळा रचला. यावेळी, संशयास्पद असलेला एक ताडपत्रीने गुंडाळलेला ट्रक पोलीस पथकाने थांबून ट्रक चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये १३ बैल पथकाला मिळून आले. याप्रकरणी साजिद व रेहान यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील बैल व ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची जनावरे ही जुन्नरवरून आणण्यात आली असून हे कोणास विकण्यासाठी आले होते याचा तपास पोलीस करीत असून सदर बैल यांना बापगाव येथील गौशाळा येथे सुरक्षितेच्या दृष्टीने ठेवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरक्षक घोलप यांनी दिली.