खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

By प्रशांत माने | Published: October 9, 2022 03:50 PM2022-10-09T15:50:14+5:302022-10-09T15:52:11+5:30

एकाला वाचविण्यात यश, भोपर गावातील घटना; खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे

Two children drowned while swimming in mine water | खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

Next

डोंबिवली: येथील भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी दोघा मुलांचा बुडून दुर्देवी मुत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अन्य एका बुडणा-याला उर्वरीत तिघांनी वाचविले. मे महिन्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना संदप-भोपर परिसरात घडली होती. रविवारी घडलेल्या घटनेमुळे खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

आयुष केदारे (वय १२) आणि आयुष गुप्ता (वय १३) दोघेही रा. आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टी अशी मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. हे दोघे रविवारी सुट्टी असल्याने सकाळी अतुल अवटे, किर्तन म्हात्रे, पवन चव्हाण, परमेश्वर घोडके यांसह अन्य काही मित्रांबरोबर ज्योतीनगरमधील एका शाळेच्या पटांगणावर क्रिकेट खेळत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोघेजण अतुल, किर्तन, पवन आणि परमेश्वर यांच्यासह सायकलवरून भोपर येथील खदानीच्या पाण्यात पोहायला गेले होते. खदानीत उतरलेल्या सहाजणांपैकी अतुल, पवन, किर्तन हे खदानीच्या काठावर तर आयुष केदारे, आयुष गुप्ता आणि घोडके हे खोलवर पाण्यात पोहायला गेले होते. त्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. यातील घोडकेला वाचविण्यात अन्य तिघांना यश आले परंतू दोघेही आयुष हे चिखलात रूतले गेल्याने त्यांना वाचविता आले नाही. ते बुडाल्याने चौघांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पलावा अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह हाती लागला. दरम्यान या घटनेने आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टीत शोककळा पसरली आहे.

डोंबिवली नजीकच्या संदप, खोणी, भोपर, चिंचपाडा, पलावा या ग्रामीण भागाच्या ठिकाणी अशा अनेक खदानी आहेत. त्याचा वापर गणेश विसर्जनासाठी होतो. एप्रिल- मे महिन्यात गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने तेथील लोक कपडे धुण्यासाठी देखील या खदानींचा वापर करतात. मे महिन्यात पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संदप-भोपर परिसरातील खदानीत  ही घटना घडली होती. आता रविवारी भोपर गावातील खदानीत दोघांना जीव गमवावा लागला आहे.  एकुणच ग्रामीण परिसरातील खदानींवर घडलेले आजवरचे अपघात पाहता संबंधित यंत्रणेने त्या कायमस्वरूपी बुजविणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का?अन्यथा हा जीवघेण्या अपघातांचा सिलसिला कायम चालू राहील यात शंका नाही.

Web Title: Two children drowned while swimming in mine water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.