मित्रांची जोडगोळी हिमालयाच्या कुशीत हरवली; ट्रेकिंगसाठी गेलेले दोन जिवलग मित्र बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:36 PM2021-10-27T19:36:18+5:302021-10-27T19:38:28+5:30
हिमाचल प्रदेशातील किन्नोर परिसरात मोठा हिमवर्षाव झाला. यामध्ये 14 जणांना वाचवण्यात यश आलंय. मात्र तिघे जण अजूनही बेपत्ता आहेत.
डोंबिवली - ऐन दिवाळीच्या तोंडावर डोंबिवलीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. 23 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशातील किन्नोर परिसरात मोठा हिमवर्षाव झाला. यामध्ये 14 जणांना वाचवण्यात यश आलंय. मात्र तिघे जण अजूनही बेपत्ता आहेत. यातील दोघे जण डोंबिवलीमधील रहिवासी आहेत. हे दोघेही शाळेपासून जिवलग मित्र असून 60 ओलांडल्यानंतरही त्याची मैत्रीत कुठेही दुरावा आला नाही. मात्र आता हे दोघेही हिमालयाच्या कुशीत हरवले असल्यामे त्यांची इतर मित्रमंडळी व नातेवाईक त्यांच्या परतीच्या वाटेकडे आस लावून बसलेत. सुमारे 40 वर्षांपासून एकत्र ट्रेकिंग करणा-या मित्रांची जोडगोळी हिमालयाच्या कुशीत अचानक गडप झाली आहे.
66 वर्षीय अशोक भालेराव आणि 67 वर्षीय राजेंद्र पाठक अशी या दोन मित्रांची नावं आहेत. हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र असून त्यांना ट्रेकिंग ची आवड होती. 60 नंतर ही या दोघांनी ट्रेकिंग ची आवड कायम ठेवली होती. डोंबिवली पूर्वेकडील सुरेखा को सोसायटीत राजेंद्र पाठक हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. ते उत्कृष्ट हार्मोनियम आणि गिटार वादक देखील आहेत. तर ठाकुर्लीमधील स्नेहगंध इमारतीत अशोक भालेराव हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. 10 दिवसांची ट्रेक संपवून ते 27 ऑक्टोबर ला परतणार होते. 23 तारखेला हिमालयात मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव झाला आणि 17 जणांच्या ग्रुप सोबत ट्रेकिंगला गेलेले तीन जण बेपत्ता झाले.
14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं. भालेराव आणि पाठक हे बेपत्ता झाल्याचं वृत्त ग्रुप मधील इतरांनी त्यांच्या घरी फोन करून सांगितल. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे नातेवाईक दोघांचा काही शोध लागला का? याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान बुधवारी देखील शोधमोहीम पार पडल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. लहानपणापासून हे दोघे एकत्र खेळले...बागडले... एकत्र अनेक ट्रेक केले.. मात्र हिमालयाच्या या ट्रेकमध्ये या दोघांची मैत्री अचानक अशी हरवेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आता या जोडगोळीचा कधी शोध लागतो ते पाहावं लागेल.