डोंबिवली शिवसेना शहर शाखेत दोन गट परस्परांना भिडले; शिंदे पिता-पुत्रांंचा फोटो लावण्यावरून सुरू होता वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:34 AM2022-08-03T11:34:42+5:302022-08-03T11:34:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेनेच्या शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेनेच्या शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावण्यावरून शिंदेसमर्थक आणि उद्धव ठाकरेसमर्थक एकमेकांना भिडले. दोघांनी शाखेवर ताबा असल्याचा दावा करीत शाखेत ठाण मांडले. यावेळी शाखेत अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावरून शाखेत दोन्ही गटांमध्ये प्रचंड वाद झाला.
राज्याचे राजकारण तापले असून, खरी शिवसेना कोणाची, असा सवाल शिंदे व ठाकरे गटांकडून केला जात आहे. शाखा ताब्यात घेण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप केल्यावर डोंबिवली शिवसेना शहर शाखेतील शिंदे पिता-पुत्रांची छायाचित्रे काढली होती. केवळ स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो कायम ठेवण्यात आले होते.
मंगळवारी दुपारी शाखेत उद्धव ठाकरेसमर्थक आणि शहरप्रमुख विवेक खामकर हे बसलेले असताना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे समर्थक शाखेत घुसले. त्यांनी त्याठिकाणी शिंदे पिता-पुत्रांचा फोटो लावला. त्याला ठाकरे यांच्या गटाने तीव्र विरोध केला. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांच्यात प्रचंड राडा झाला. यावेळी शिवसेनेचे सदानंद थरवळ आणि कविता गावंड हे शाखेत होते. शाखेत राडा झाल्याचे कळताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला. दोन्ही गटांत मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तब्बल तीन तास शाखेत पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू होती. याबाबत रमेश म्हात्रे म्हणाले की, शिंदे यांचा फोटो काढला होता. तो पुन्हा लावण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. तो पुढाकार आम्ही घेतला.
शहरप्रमुख खामकर म्हणाले की, मंगळवारी १५० कार्यकर्ते अचानक शाखेत आले. त्यांनी येऊन शिवसेना शाखा सोडण्याकरिता जबरदस्ती केली. आम्ही शाखा सोडणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असे सांगितले.
दरम्यान, शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीच्या सर्वेश हॉलमध्ये सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला आहे. ठाकरे गट शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेेनेतील गटातटाच्या वादातून डोंबिवली शहरप्रमुख खामकर यांना अटक झाली होती. एक दिवसाच्या अटकेनंतर त्यांना जामीन मिळाला. या पार्श्वभूमीवर दोन्ही गट मंगळवारी पुन्हा परस्परांना भिडल्याचे चित्र दिसले.