डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये द्वारका विद्यालयातील दोन विद्यार्थिनींना पदक
By सचिन सागरे | Published: April 8, 2024 03:50 PM2024-04-08T15:50:30+5:302024-04-08T15:52:24+5:30
नववीतील प्रिती यशवंत जाधवला सुवर्ण तर वैष्णवी संदिप आनेकरला रौप्यपदक
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये पूर्वेकडील नांदिवली येथील एस. डी. एल. के. एज्युकेशन ट्रस्ट संचालित द्वारका विद्यामंदिर विद्यालयातील नववीतील विद्यार्थीनी प्रिती यशवंत जाधवला सुवर्णपदक तर वैष्णवी संदिप आनेकरला रौप्य पदक प्राप्त झाले. या परीक्षेत कल्याणला पहिल्यांदा सुवर्णपदक प्राप्त झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबईतील पाटकर हॉल येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात नौदल प्रमुख सुनिल सुळे यांच्या हस्ते हे पदक वितरीत करण्यात आले. सुवर्णपदक जाहिर होताच विद्यालयाचे संस्थापक डी. बी. दळवी व द्वारका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या संचालिका मिरा दळवी यांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींची पारंपारिक ढोल ताशाचा पथकासह भव्य मिरवणुक काढली. यावेळी, नांदिवली गावचे ग्रामस्थ रामदास ढोणे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोष खामकर, पालक यशवंत जाधव यांच्यासमवेत पालक, ग्रामस्थ, विद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत या दोन्ही विद्यार्थिनींनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. तसेच शिक्षक, विद्यार्थी पालकांसाठी ही खूप मोठी गौरवास्पद कामगिरी असल्याचे गौरोद्गार संस्थापक दळवी यांनी काढले.
परीक्षेत दोन्ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका ललिता शिंदे, अतुल तावरे यांचा देखील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.