मोटारीने दिलेल्या धडकेत कल्याणमध्ये दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 09:08 AM2020-12-11T09:08:11+5:302020-12-11T09:08:34+5:30
वालधुनी परिसरातील जगदीश दुग्धालयासमोर बुधवारी रात्री ९.३० वाजता एका भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण : वालधुनी परिसरातील जगदीश दुग्धालयासमोर बुधवारी रात्री ९.३० वाजता एका भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणेश दराडे व त्यांचा मित्र बाळकृष्ण धुळेकर हे एका मोटारीने जात होते. रस्त्यात त्यांना त्यांचा मित्र विजय सोनावणे भेटला. सोनवणे व दराडे हे दोघेही पेस्ट कंट्रोलचे काम करतात. दराडे यांनी विजयला पाहून गाडी थांबवत रस्त्याच्या बाजूला उभी केली. तिघेही गाडीमागे बोलत होते. त्याच वेळी उल्हासनगरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीने या तिघांसह मोटाराला जोराची धडक दिली. या घटनेत दराडे आणि सोनावणे यांचा मृत्यू झाला. तर, धुळेकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर चव्हाण करत आहेत.
भरधाव मोटारीने तिघांसह उभ्या असलेल्या मोटारीला ठोकल्याने तेथे गाडी एका विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे वालधुनी परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अंधारात मदतकार्य करताना आजूबाजूच्या नागरिकांची धावपळ उडाली. या अपघातामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस व रुग्णवाहिका येण्यापूर्वीच नागरिकांनी अपघातग्रस्तांना रिक्षाने रुग्णालयात नेले होते. दरम्यान, घटनास्थळी मनपाने जाहिरातीचा खांब उभारण्यासाठी खड्डा खोदला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तोच भाग वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.