दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेन खुल्या होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:53 PM2021-05-05T23:53:20+5:302021-05-05T23:53:38+5:30

काम अंतिम टप्प्यात : आयुक्तांनी केली पाहणी : जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सुरू

Two lanes of Durgadi creek bridge will be opened | दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेन खुल्या होणार

दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेन खुल्या होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडी पुलाच्या सहापैकी दोन लेन येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.  या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पाहणी केल्यानंतर ही माहिती देण्यात आली. यावेळी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, नगररचनाकार रघुवीर शेळके आदी उपस्थित होते. 

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पूल हा दोन लेनचा होता. युती सरकारच्या काळात त्याचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेला पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. याच पुलाला समांतर सहा पदरी दुर्गाडी खाडी पुलाला २०१६ मध्ये मंजुरी दिली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. पुलाच्या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्याने त्याला दिलेले कंत्राट दोन वर्षांनंतर रद्द केले. नंतर १०१ कोटी रुपये खर्चाचे सहा पदरी पुलाचे काम तांदळकर आणि थोरात कंपनीला दिले. या कंपनीने रायगड येथील सावित्री पूल तयार केला होता. त्या कंपनीने पुलाचे काम युद्धपातळीवर उचलले. मात्र, २०१९ मध्ये अतिवृष्टीचा बसलेला फटका आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे पुलाच्या कामाची गती मंदावली होती. सहापैकी दोन लेन जूनच्या पहिल्या आठवड्यात खुल्या झाल्यावर जुना दोन लेनचा पूल आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन लेन अशा चार लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित चार लेनही भविष्यात खुल्या केल्या जातील. भिवंडी-कल्याण-शीळ रोडवरील दुर्गाडी खाडी पूल हा महत्त्वाचा पूल आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणचा पत्री पूल मार्गी लागला. त्यापाठोपाठ दुर्गाडीच्या दोन लेन खुल्या होत असल्याने वाहतूक कोंडीचा महत्त्वाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

रिंग रोडच्या कामासाठी एमएमआरडीएने मागितले पोलीस संरक्षण

दुर्गाडी खाडी पुलाच्या कामाची पाहणी केल्यावर महापालिका आयुक्तांनी कल्याण रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यानची पाहणी केली. रिंग रोडचे या टप्प्यातील  ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. 

मात्र, काही ठिकाणी अडथळे आहेत. रिंग रोडचे काम ज्या ठिकाणी पूर्णत्वास आले आहे त्याचा वापर सुरू झाला आहे. झालेले काम जून महिन्यापर्यंत महापालिकेस हस्तांतरित केले जाईल. 

ज्याठिकाणी कामाला विरोध आहे. त्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने रेलकॉन कंत्राटदार कंपनीने पोलीस व महापालिका प्रशासनाकडे केली आहे. 

Web Title: Two lanes of Durgadi creek bridge will be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण