मनसेत आणखी दोघांचे राजीनामे; इरफान यांना सेना, राष्ट्रवादीची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:19 AM2022-04-18T11:19:02+5:302022-04-18T11:20:40+5:30
काझीमुद्दीन शेख गेल्या १२ वर्षांपासून मनसे पक्षात आहेत. त्यांनी राजीनामा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडे सोपविला आहे.
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यापाठोपाठ कल्याणमध्येही राजीनामा सत्र सुरू झाले आहे. राज यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरुवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला असताना विभागाध्यक्ष काझीमुद्दीन शेख आणि उपशाखा अध्यक्ष गौस शेख (शेख भाई) या दोघांनी मनसेच्या पदाचे आणि सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, इरफान शेख यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काझीमुद्दीन शेख गेल्या १२ वर्षांपासून मनसे पक्षात आहेत. त्यांनी राजीनामा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडे सोपविला आहे. तर उपशाखा अध्यक्ष गौस शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. खरेतर कधी अशी परिस्थिती समोर येईल, असे वाटले नव्हते. आपण ज्या पक्षात काम करतो, तोच पक्ष आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल तर नक्कीच पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली आहे, असे गौस यांनी नमूद केले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरी भोंगावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील मुस्लिम पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. हे कसे रोखणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
इरफान यांना सेना, राष्ट्रवादीची ऑफर
प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिलेले इरफान शेख यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून ऑफर असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने इरफान यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, याबाबत इरफान यांनी मौन बाळगले आहे.