चोरलेल्या बॅटऱ्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेली ‘दुकली’ गजाआड, मोठ्या वाहनांच्या तीन बॅटऱ्या जप्त
By प्रशांत माने | Published: June 20, 2024 06:30 PM2024-06-20T18:30:34+5:302024-06-20T18:31:04+5:30
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
डोंबिवली: तीन टेम्पोच्या बॅट-या चोरून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सुहास उर्फ चिंग्या विजय पाईकराव ( वय २१) आणि रॉकी उर्फ मोनू रमेश चव्हाण ( वय १८ ) दोघेही रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंबिवली पूर्व या दोघा चोरटयांना बुधवारी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावून अटक केली. तीन बॅट-या असा ८ हजाराचा मुद्देमाल दुकलीकडून जप्त केला असून त्यांना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोनजणांनी टेम्पोच्या मोठया बॅट-या कोठून तरी चोरून आणल्या असून त्या विकायला मानपाडा शीळ रोडवरील प्रीमियर कॉलनी मैदानाजवळ येणार आहेत. या मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले, पोलिस हवालदार बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, दिपक महाजन आणि अमोल बोरकर यांचे पथक दोघे चोरटे येणार त्याठिकाणी रवाना झाले. पथकाने सापळा लावला. बुधवारी दुपारी ३.३० वाजता बातमीदाराने केलेल्या वर्णनाप्रमाणे दोघेजण रिक्षातून उतरले. त्यांच्या हातात गोण्या आणि त्यात काहीतरी जड वस्तू होती. संशयावरून दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यात तीन बॅट-या आढळुन आल्या. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी बॅट-या चोरल्याची आणि त्या विकण्यासाठी आल्याची कबुली दिली.
स्मशाल चौकातील टेम्पोच्या बॅटऱ्या चोरल्या -
आरोपी सुहास आणि रॉकी यांनी डोंबिवली पुर्वेकडील शेलार नाका जवळील स्मशाल चौकात पार्क केलेल्या दोन अॅपे टेम्पो आणि एक टाटा टेम्पो अशा तीन गाडयांमधून या तीन बॅट-या चोरल्या होत्या. या चोरीप्रकरणी टेम्पो मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान दोघा आरोपींना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून बॅट-या चोरीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येतात का? याचा तपास टिळकनगर पोलिस करीत आहेत.