उंबार्लीत श्रमदानातून दोन जलस्रोत झाले पुनरुज्जीवित; ३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:27 PM2021-04-29T23:27:37+5:302021-04-29T23:28:08+5:30

३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार : दोन फूट खोल मातीचा गाळ काढला

Two water sources were revived through labor in Umbarli | उंबार्लीत श्रमदानातून दोन जलस्रोत झाले पुनरुज्जीवित; ३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

उंबार्लीत श्रमदानातून दोन जलस्रोत झाले पुनरुज्जीवित; ३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

Next

डोंबिवली : उंबार्ली येथील पक्षी अभयारण्यामध्ये ३० पर्यावरणप्रेमींनी १८ आणि २५ एप्रिल, अशा सलग दोन रविवारी श्रमदान करून दोन नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले. या जलस्रोतांमध्ये यावेळी पाण्याबरोबर गाळही काढण्यात आला. त्यामुळे आता त्यात अधिक प्रमाणात पाण्याचा साठा होणार आहे. त्याचा फायदा परिसरातील झाडांबरोबर पशू-पक्ष्यांना होईल, असे सांगण्यात आले.

उंबार्ली बाजूच्या डोंगरावर उंबराचे पाणी हा पाणवठा असून, त्याच्या कातळात जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी या पाण्याचा वापर उंबार्लीतील ग्रामस्थ शेती व गुरांसाठी करत असत; पण गेली कित्येक वर्षे त्याचा वापर बंद आहे, तसेच पावसाच्या पाण्याबरोबर आलेल्या मातीचा गाळ त्यात साचला होता. श्रमदान शिबिरात जवळजवळ दोन फूट मातीचा ओला गाळ आणि चिखल या पाणवठ्यातून काढण्यात आला, तसेच गाळ व माती परत आत येऊ नये, यासाठी दगडांचा बंधारा बांधण्यात आला.

पाणवठ्याजवळ उंबराचे झाड असून, तिथे खोलगट भाग आहे. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी त्यात साठवण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. साधारण १५ बाय १० फूट, असा हा खड्डा आहे. खड्ड्यातून काढलेली माती दगडी बंधारा तयार करून त्यावर लेपण्यात आली, तसेच खड्ड्यात डोंगरावरची माती येऊ नये म्हणून वरच्या बाजूस डोंगर उतारावर मातीत चर खोदले. माती पावसाबरोबर वाहून जाणार नाही व पाणी जास्तीत जास्त मुरेल आणि ते झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल, असे पर्यावरणप्रेमी मंगेश कोयंडे यांनी सांगितले. असेच अनेक उपक्रम डोंबिवली पक्षी अभयारण्यात राबविण्यात येतील. अशा उपक्रमांद्वारे पक्षी, प्राण्यांचे आणि झाडांचे संवर्धन, संरक्षण योग्यरीत्या करण्यात येईल, असे ते म्हणाले.

या संस्थांनी घेतला सहभाग
सलग दोन रविवार सकाळी ३० स्वयंसेवकांनी श्रमदान केले. या उपक्रमात उंबार्ली, सोनार पाडा, दावडी, भाल, धामटन, खोणी आणि निळजे ही डोंबिवली पक्षी अभयारण्य लगतच्या गावांतील ग्रामस्थही सहभागी झाले होते.

Web Title: Two water sources were revived through labor in Umbarli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण