उद्धव सेनेचा मॉकपोलला विरोध, न्यायालयात दाद मागणार; जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रेंचा निवडणूक आयोगाला इशारा
By मुरलीधर भवार | Updated: February 5, 2025 17:12 IST2025-02-05T17:10:59+5:302025-02-05T17:12:19+5:30
जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी माजी खासदार राजन विचारे यांच्यासह आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली.

उद्धव सेनेचा मॉकपोलला विरोध, न्यायालयात दाद मागणार; जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रेंचा निवडणूक आयोगाला इशारा
मुरलीधर भवार, डोंबिवली- विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी ज्या बूथवर मते कमी पडली. त्या बूथवरील मतांची पुन्हा माेजणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या मोजणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रिकाऊंटीगकरीता पैसे भरले हाेते. पैसे भरुन देखील आत्ता रिकाऊंटींग न करता मॉकपोल केले जाईल असे जिल्हाधिकाऱ््यांनी संबंधित पराभूत उमेदवारांना सांगितले आहे. उद्धव सेनेने त्याला कडाकडून विरोध केला आहे. मॉकपोलला विरोध असून रिकाऊंटींगच झाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली आहे. अन्यथा निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी माजी खासदार राजन विचारे यांच्यासह आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, रिकाऊंटींग केले जाणार नाही. मॉकपोल केले जाईल असे स्पष्ट केले. मॉकपोलला उद्धव सेनेचा विरोध आहे. पराभूत उमेदवारांनी रिकाऊंटींगसाठी पैसे भरले आहेत. ही बाब निवडणूक आयोगाने पैसे भरण्यापूर्वीच स्पष्ट केली पाहिजे होती.
म्हात्रे यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. म्हात्रे हे पराभूत झाले होते. त्यांना काही बूथवर मिळालेल्या मतांविषयी संशय आहे. त्यांनी रिकाऊंटींगकरीता जिलाहाधिकारी कार्यालयाकडे पाच लाख रुपये भरले. पैसे भरुनही रिकाऊंटींग करण्यात येत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. आत्ता पराभूत उमेदवारांना रिकाऊंटींगची तरतूद नसल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोग त्यांची भूमिका बदलत आहे. वारंवार नवे जीआर काढत आहे. बूथवरील सीसीटीव्ही फूटेजही दिले जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.