कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी केला दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 07:55 AM2024-01-14T07:55:09+5:302024-01-14T07:56:18+5:30
कल्याणच्या दौऱ्यात ठाकरे म्हणाले की, घराणेशाहीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध असेल तर आपल्याकडून गेलेल्यांचे तिकीट मोदीच कापतील.
कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा या शहरांना भेटी देऊन शिवसैनिकांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांनी लक्ष्य केले.
कल्याणच्या दौऱ्यात ठाकरे म्हणाले की, घराणेशाहीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध असेल तर आपल्याकडून गेलेल्यांचे तिकीट मोदीच कापतील. ‘वापरा आणि फेका’ हेच भाजपचे धोरण असल्याने ते पराभूत होतील. समजा मोदींनी धाडले नाही तर आपण आहोतच त्यांना घरी पाठवायला, असा टोला त्यांनी लगावला.
मी शिवनेरीला गेलो तर तिकडेही येतील?
उल्हासनगर : नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार असल्याचे मी जाहीर करताच पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला भेट देऊन साफसफाई केली. आज जाहीर करतो की, रामजन्मभूमी कार्यक्रमापूर्वी शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन घेऊन येतो. पंतप्रधान मोदी यांना याची माहिती मिळाल्यावर शिवनेरीला जातात का ते बघावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.
राम मंदिर लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे
अंबरनाथ : मोदी यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. राम मंदिराची पूजा राष्ट्रपतींच्या होणे गरजेचे होते, असेही ते म्हणाले.
उद्धव आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही जिथून कुठून निवडणूक लढायची आहे त्यांनी लढावी, कल्याणमधून लढा वा कोपरीतून, ते कुठूनही लढले तरी आमची तयारी आहे.
-डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार,
कल्याण लोकसभा