डोंबिवलीत भरपावसात उद्धव ठाकरेंची सभा; शिवसैनिकांनीही भिजत उभं राहून ऐकलं भाषण
By मुरलीधर भवार | Published: May 16, 2024 09:51 PM2024-05-16T21:51:44+5:302024-05-16T21:52:42+5:30
मुरलीधर भवार, डोंबिवली: डोंबिवलीत भागशाळा मदानात उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरपावसात भिजत जाहीर प्रचार सभा घेतली. शिवसैनिक सुध्दा भरपावसात ...
मुरलीधर भवार, डोंबिवली: डोंबिवलीत भागशाळा मदानात उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरपावसात भिजत जाहीर प्रचार सभा घेतली. शिवसैनिक सुध्दा भरपावसात उभे राहून सभा ऐकत होते. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असताना पावसातली सभा राजकारणाची चर्चेचा विषय ठरली.
१३ मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या महाविकासआघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांची सभा भागशाळा मदानात आयोजित केली होती. त्यादिवशी सोसायटयाचा वारा आणि पाऊस आल्याने सभा रद्द केली गेली. त्यामुळे उध्दवसेनेच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. रद्द झालेली सभा गुरूवारी पु्न्हा भागशाळा मदानात आयोजित केली होती.सभेच्या ठिकाणी ठाकरे यांचे आगमन होण्यापुर्वी जोरदार वारा आणि पाऊस सुरू झाला.
सभेसाठी आलेले लोक पावसामुळे पांगले, तेव्हा सभेला संबोधित करणारे खासदार संजय राऊतांनी निष्ठावंत शिवसनिक संकटांना घाबरत नाही त्यामुळे कोणी कुठेही जाऊ नये असे आवाहन केले. या आवाहनाला दाद देत लोक पुन्हा सभेत दाखल झाले. भरपावसातच ठाकरे यांचे आगमन झाले आणि लगेचच भाषणाला सुरूवात झाली. सभेला मिळालेला प्रतिसाद पाहुुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. आपली निशाणी मशाल आहे ती विझू दयायची नाही असे आवाहन करतात उपस्थितांनी आपल्या हातातील मोबाईलचे टॉर्च लावत ते उंचावून धरले आणि अनेकांनी तर बसायच्या खुर्च्या डोक्यावर धरून सभा ऐकली.
साताऱ्यात भरपावसात जाहीर सभेला संबोधित करण्याचे धाडस शरद पवार यांनी केला होते. त्यांची सभा अत्यंत गाजली होती. त्यांच्या पश्चात पवारांच्या सोबत असलेले ठाकरे यांनीही त्यांचाच राजकीय कित्ता गिरवून कार्यकर्त्यांचे मनोबल खचून न देता भाषण केले.