नागरिकांना सांगणार काय? उल्हासनगर भकास शहर म्हणत शिंदेसेनेच्या नेत्याने व्यक केली खदखद
By सदानंद नाईक | Published: August 9, 2024 02:16 PM2024-08-09T14:16:30+5:302024-08-09T14:47:26+5:30
उल्हासनगर भकास शहर असून त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदेसेनेच्या नेत्याने केला आहे.
उल्हासनगर : शहराला हजारो कोटीचा निधी देऊनही शहर भकास झाल्याचा आरोप ७५ व्या स्थापना दिवस कार्यक्रम वेळी शिवसेना शिंदेसेनेचे नेते राजेंद्र चौधरी यांनी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत केला. याला महापालिका प्रशासन जबाबदार असून पक्षाकडून जाब विचारणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिकेतील विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण करण्यासाठी एका वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील संच्युरी मैदानावर आले होते. शहरविकासासाठी आपण ११५० कोटीचा निधी दिल्याचे सांगून, यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे आश्वासन भाषणत दिले होते. मात्र दिड वर्षानंतरही शहराचा विकास दिसण्या ऐवजी शहर भकास झाल्याचा आरोप सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून अप्रत्यक्ष होत होता. मात्र शहराच्या ७५ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजेंद्र चौधरी यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगून आयुक्त अजीज शेख यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले.
शहरात कोट्यवधींच्या निधीतून बांधण्यात आलेले रस्ते खोदून ४२६ कोटीच्या निधीतून गटारीचे पाईप टाकले जात आहे. मात्र खोदलेले रस्त्याची दुरुस्ती नियमानुसार केली नाही. तसेच १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू केले. त्यासाठीही रस्ते खोदण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले. तसेच १२३ कोटीच्या निधीतून पाणी पुरवठा योजना सुरू होत आहे. शासनच्या मूलभूत निधीतून ४८ कोटीची एकून १२६ कामे, त्यानंतरच्या २९ कोटीच्या निधीतून विविध कामे सुरू आहेत. मात्र एकही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र शहरात आहे. एकूणच अर्धवट विकास कामामुळे शहर भकास दिसत असल्याचा आरोप शिवसेना शिंदेगटाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी केला.
नागरिकांना सांगणार काय... राजेंद्र चौधरी
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून नागरिकांना शहर विकासाबाबत सांगणार काय? असा प्रश्न शिंदेसेनेचे नेते राजेंद्र चौधरी यांनी केला. रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, विकास कामाचा बोजवारा, महापालिकेतील अर्धेअधिक पदे रिक्त, अवैध बांधकामे आदींचा प्रश्न चौधरी यांनी केले.
आयलानी यांना अप्रत्यक्ष टोला
शहराचे आमदार कुमार आयलानी यांनी शहर विकासासाठी किती निधी आणला?. अर्धवट कामाबाबत आक्रमकता नाही. असे अप्रत्यक्ष आरोप केले.