उल्हासनगर महापालिका शाळांची आयुक्ताकडून झाडाझडती; एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस
By सदानंद नाईक | Updated: February 13, 2025 18:08 IST2025-02-13T18:07:49+5:302025-02-13T18:08:11+5:30
शाळा प्रांगणातील अवैध टपरी वजा दुकान हटवीण्याचे आदेश

उल्हासनगर महापालिका शाळांची आयुक्ताकडून झाडाझडती; एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस
उल्हासनगर : महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी निवड केलेल्या आदर्श महापालिका शाळांची पाहणी करून विविध त्रुटींवर बोट ठेवले. तसेच मुलाच्या गुणवत्ता प्रकरणी एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावून शाळा प्रांगणातील अवैध टपरी वजा दुकान हटवीण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर महापालिका शाळेची गुणवत्ता व दर्जा उंचाविण्यासाठी तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी ५ शाळा आदर्श शाळा घोषित केल्या. तसेच त्यांना अद्यावत सुखसुविधा दिल्या. त्या शाळा क्रं-८, २३ व २९ शाळेची पाहणी गुरुवारी आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी केली. पाहणी दरम्यान आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. वाचन कौशल्य चाचणीत काही त्रुटी निदर्शनास आल्यामुळे शाळा क्रं-८ मधील एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
महापालिका शाळा क्रं-८ च्या प्रांगणातील नियमबाह्य असलेली टपरी दुकान तत्काळ हटविण्याचे आदेश दिले. प्रभाग अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत अनधिकृत टपरी दुकान निष्काशीत केले आहे. शाळेच्या व नवीन अभ्यासिकेचे आणि इमारतीच्या बांधकामाचेही आयुक्तांनी निरीक्षण केले. त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचवत, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्ताना दिले. यावेळी सहायक आयुक्त मयुरी कदम, प्रशासन अधिकारी कुंदा पंडित, बांधकाम अभियंता दीपक ढोले, विद्युत अभियंता हनुमंत खरात यांच्यासह इतर अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.