बोगस डॉक्टरावरील कारवाईसाठी उल्हासनगर महापालिका आयुक्ताचे पोलीस आयुक्ताना पत्र
By सदानंद नाईक | Updated: December 19, 2024 20:05 IST2024-12-19T20:05:16+5:302024-12-19T20:05:32+5:30
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, कॅम्प नं-४ परिसरातील ३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले.

बोगस डॉक्टरावरील कारवाईसाठी उल्हासनगर महापालिका आयुक्ताचे पोलीस आयुक्ताना पत्र
उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल होऊनही स्थानिक पोलीस कारवाई करीत नाही. असे पत्र थेट पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे व पोलीस आयुक्त सचिन गोरे यांना देऊन कारवाईची मागणी केली. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने, पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, कॅम्प नं-४ परिसरातील ३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले. मात्र गुन्हे दाखल होऊन २० दिवस उलटूनही विठ्ठलवाडी पोलिसांनी कारवाई केली नसल्याने, बोगस डॉक्टरांचे क्लिनिक राजरोसपणे सुरु आहेत, असी खंत महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी व्यक्त केली.
डॉ. धर्मा यांनी याबाबत आयुक्त विकास ढाकणे यांना माहिती दिल्यावर, आयुक्त ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई होण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना पत्र पाठविले. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने, पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. २९ नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार ३१९(२), ३१८(४) तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियमन १९६१ नुसार ३३ व ३६ नुसार गुन्हा दाखल झाला. तसेच तब्बल २६ डॉक्टरांची चौकशी आरोग्य विभागाने सुरु केल्याने, बोगस डॉक्टरांत खळबळ उडाली.
महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मा यांनी यापूर्वी कारवाई केलेल्या बोगस डॉक्टरांचे क्लिनिक सुरु असल्याची माहिती दिली. तसेच चौकशी सुरु असलेल्या २६ पैकी अनेक डॉक्टर बोगस असल्याचे संकेत दिले. महापालिका आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत असताना पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली. आरोग्य विभागाने चौकशी सुरु केलेल्या मध्ये अनेक डॉक्टर बोगस असल्याचे संकेत देऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती डॉ.धर्मा यांनी दिली.