उल्हासनगर महापालिका परिवहन बसचे तिकीट दर निश्चित
By सदानंद नाईक | Published: March 8, 2024 12:12 AM2024-03-08T00:12:54+5:302024-03-08T00:13:11+5:30
वातानुकूलित बसचे १० तर विनावातानुकूलित बसचे तिकीट ५ रुपये
उल्हासनगर : मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरणांची बैठक गुरवारी संपन्न होऊन शहरातील बसचे तिकीट दर निश्चित करण्यात आले. कमीतकमी २ किमी अंतरासाठी वातानुकूलित बसचे तिकीट १० तर विनावातानुकूलित बसचे तिकीट ५ रुपये असणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. उल्हासनगर परिवहन बससेवा सज्ज असून बस केव्हाही रस्त्यावरून धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन बससेवेसह अन्य विकास कामाचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले.
गुरूवारी मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली असून बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव, परिवहन आयुक्त, वाहतूक विभाग अधिकारी, महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे, परिवहन विभाग प्रमुख विनोद केणे उपस्थित होते. २ किमी अंतरापर्यंत वातानुकूलित बसची तिकीट १० रुपये तर ४ किमी पर्यंत १५ रुपये, ६ किमी पर्यंत १८ रुपये तर ८ किमी अंतरापर्यंत २५ रुपये राहणार आहेत. तर विना वातानुकूलित बसचे तिकीट दर २ किमी अंतरापर्यंत ५ रुपये, ४ किमी पर्यंत १० रुपये, ६ किमी पर्यंत १२ रुपये तर ८ किमी पर्यंत १८ रुपये असणार आहे. त्यांनतर प्रत्येक २ किमी अंतरावर २ ते ३ रुपये तिकिटाचे दर वाढणार आहे. तर मुलांना निश्चित तिकीटच्या अर्धी तिकीट राहणार आहे.
महापालिका परिवहन बस धावण्यासाठी सज्ज असून बस डेपो, चार्जिंग स्टेशन, चालक व वाहक सज्ज आहेत. केंद्राने चार्जिंग स्टेशनसाठी ५ कोटीचा निधी दिला आहे. तर केंद्राकडून बस डेपोसाठी १५ कोटी ३० लाख व डेपोच्या नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्यात साठी ३ कोटी मंजूर झाला. तसेच केंद्राकडून १०० बसेस महापालिकेला लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार असून परिवहन बस सेवेमुळे कमीतकमी १ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.
परिवहन बसमध्ये गारागार प्रवास
महापालिका परिवहन बससेवा सज्ज होऊन मुख्यमंत्री यांच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण होणार आहे. शहरात धावणाऱ्या वातानुकूलित व विना वातानुकूलित बस सेवेचे तिकीटदर निश्चित झाले असून नागरिकांना कमीतकमी पैश्यात शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गारागार प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना बस बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.