उल्हासनगरातील भुयारी गटार योजना वादात? ईगल कंपनीच्या निविदा रद्द करा - अविनाश जाधव
By सदानंद नाईक | Published: October 30, 2023 06:52 PM2023-10-30T18:52:55+5:302023-10-30T18:53:11+5:30
उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले शेकडो कोटीच्या निधींतील रस्ते निकृष्ट बांधल्याचे उघड झाले.
उल्हासनगर : चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाण पुलाच्या ठेकेदारांने शहरातील ४१६ कोटीची भुयारी गटार योजनेचा ठेका घेतला आहे. उड्डाणपूला प्रमाणे गटारीचे काम निकृष्ट होणार असल्याने, ईगल कंपनीच्या ठेका रद्द करण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आयुक्त अजित शेख यांची भेट घेऊन केली.
उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले शेकडो कोटीच्या निधींतील रस्ते निकृष्ट बांधल्याचे उघड झाले. तसेच ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही शहरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे ४१६ कोटींची भुयारी गटार योजना वादग्रस्त ठरणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. दरम्यान चिपळूण येथे बांधण्यात येत असलेला हायवे रस्त्यावरील उड्डाणपूल कोसळल्याने, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईगल कंपनीवर टीका केली होती. त्याच ईगल कंपनीने शहरातील ४१६ कोटीचा भुयारी गटार योजनेचा ठेका घेऊन काही ठिकाणी काम सुरू केली. मात्र गटारीचे कामावर सर्वस्तरातून टिका होत आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी दुपारी पक्षाच्या शिष्टमंडळासह आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी चिपळूण येथील उड्डाणपूल कोसळल्याची आठवण आयुक्तांना करून देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ईगल कंपनीला ४१३ कोटीचे भुयारी गटार योजनेचे काम दिल्याचे सांगितले. निकृष्ट काम करणाऱ्या ईगल कंपनीच्या ठेकेदाराला भुयारी गटार योजना देऊ नका. अश्या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले. एका आठवड्यात याबाबत निर्णय घेतला नाहीतर, मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा जाधव यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिला. तर आयुक्तांनी नियमानुसार निविदा प्रक्रिया करून भुयारी गटारीचा ठेका ईगल कंपनीला दिल्याचे यावेळी सांगितले.
भुयारी गटारीची योजना फसवी
शहरात ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही शहरात पाणी टंचाई कायम आहेत. मात्र स्थानिक नेते व अधिकाऱ्यांचे राहणीमान उंचविले अशी टीका मनसेकडून झाली. पाणी योजने प्रमाणे भुयारी गटार योजने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जाधव यांचा सत्कार
महापालिकेच्या मनसे कर्मचारी संघटना कार्यालयात नेते अविनाश जाधव यांचा कामगार नेते दिलीप थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय घुगे, सचिन कदम, मैनुद्दीन शेख, मनोज शेलार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.