अनधिकृत बांधकामांचा फटका सर्व सामान्य नागरीकांना, वीज कार्यालयावर माजी उपमहापौरांनी काढला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:43 PM2023-04-11T20:43:04+5:302023-04-11T20:43:28+5:30
या बाबत केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या उपस्थितीत अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने टाटा पॉवर येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण - अनधिकृत बांधकामाचा फटका सर्व सामान्य नागरीकांना बसत आहे. कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील गेल्या चार दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु होता. एका ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपेक्षा जास्त लोकांना वीज पुरवठा केला जात होता. या बाबत केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या उपस्थितीत अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने टाटा पॉवर येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
पिसवली परिसरात टेकडीलगत असलेल्या भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकाम सुरु आहे. या बांधकामांना वीज पुरवठा केला जातो. जे अधिकृत घरांमध्ये राहतात. त्या सर्व समान्य नागरीकांना याचा फटका बसत आहे. एका ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपक्षा जास्त विज पुरवठा केला जात आहे. गेल्या चार दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या टाटा नाका येथील कार्यावर मोर्चा काढला. या मोर्चात माजी महापौर भोईर यांच्या सह संस्थेचे अध्यक्ष गिरधर कुऱ्हाडे आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. अडचणी सांगितल्या. माजी उपमहापाैर भोईर यांनी सांगितले की, पिसवली परिसरातील रहिवासी काॅलनीला ज्या ट्रान्सफार्मरमधून वीज पुरवठा केला जाताे. त्याच ट्रान्सफार्मरमधून टेकडीलगत असलेल्या बेकायदा चाळींना वीज पुरवठा दिला गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मरवर जास्तीच्या वीज पुरवठ्याचा लाेड येताे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत हाेताे. तसेच वीज वाहिन्या जळण्याचे प्रकार हाेत आहेत. अधिकृत वीज पुरवठा घेणाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे याकडे लक्ष वेधले.
आजच्या माेर्चा दरम्यान नागरीकांनी मांडलेल्या व्यथा एकून घेत वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे. तसेच बेकायदा वीज कनेक्शन खंडीत करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.