'कदाचित त्यांना असं बोलायचे असेल'; रामदास आठवलेंनी चंद्रकांत पाटलांची सावरली बाजू
By प्रशांत माने | Published: December 9, 2022 07:55 PM2022-12-09T19:55:33+5:302022-12-09T19:55:44+5:30
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण: कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या असे पैठणच्या एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वत्र टिका होत असताना दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र त्यांची बाजू सावरली आहे. पाटील यांनी काय वक्तव्य केले ते माहीत नाही, पण ही गोष्ट खरी आहे की, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंनी डोनेशन घेऊन स्वत:च्या पैशातून शाळा सुरू केल्या होत्या. कदाचित पाटील यांना असं बोलायचे असेल की सरकारच्या पैशावर अवलंबून राहीले पाहिजे, मात्र काही लोकांनी स्वत:च्या बळावर शाळा सुरू केल्या पाहिजेत असे त्यांना सूचवायचे असेल असे आठवले म्हणाले.
येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात नाका कामगार, फेरीवाल्यांचे अधिवेशन आज आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले उपस्थित राहीले. पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी वरील भाष्य केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सध्या जी वक्तव्य केली जात आहेत ती चुकीची असून महाराज हे आदर्श आहेत. महापुरूषांच्या नावाने समाजकारण, राजकारण करणारे सर्वच पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू नयेत याकडे आठवलेंनी लक्ष वेधले.
अलीकडच्या काळात महाराष्ट्र सोडून जाण्याच्या मागण्या होऊ लागल्या आहेत हे महाराष्ट्रासाठी भुषणावह नाही. आधीच्या सरकारने त्या गावांकडे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती ओढावली पण विद्यमान राज्य सरकारने २ हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे त्या गावांचा विकास होणे शक्य आहे. आठवले यांनी सुषमा अंधारे टिका करण्यात एक्स्पर्ट आहेत. त्यांना टिका करण्यासाठीच शिवसेनेने पक्षात घेतले आहे. पण त्यांनी सारखी टिका करू नये असा सल्ला दिला. शिवसेना- वंचित आघाडी एकत्र आले तरी फरक पडणार नाही असेही आठवले म्हणाले.